खासगी साखर कारखान्याचे सहकारी साखर कारखान्यांना आव्हान
गतवर्षीच्या दुष्काळाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईने राज्यातील शेतकऱ्यांचे उसाचे पीक जळाल्याने या वर्षीच्या ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांना उसाची मोठी टंचाई भासणार असून उसाची पळवापळवी अटळ आहे.
खासगी साखर कारखानदारांनी आतापासूनच ऊस मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याने सहकारी साखर कारखान्यांसमोर खाजगी साखर कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या वर्षी अनेक खासगी साखर कारखानदारांनी उसाला चांगला दर दिला. अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखान्यांपेक्षा अधिक दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी खाजगी कारखान्यांना मोठय़ा प्रमाणावर ऊसपुरवठा केला होता.सहकारी साखर कारखान्याचे सभासद असलेले शेतकरीच खाजगी साखर कारखान्यांना ऊस देऊ लागल्याने आगामी काळात राज्यातील सहकारी साखर कारखाने किती दिवस तग धरतील याबाबत जाणकारांकडून चिंता व्यक्त होत आहे. सध्या साखरेचे भाव चांगले असल्याने या ऊस गाळप हंगामात ऊस खरेदी आगाऊ उचल तीन हजार रुपये मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एखादा दुसरा अपवाद खाजगी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे उसाचे पसे वेळेवर दिले नाहीत. परंतु दुसरीकडे खाजगी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना अनेक सोयी उपलब्ध करून देऊन पारदर्शकता आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते.
आगामी काळात साखर उद्योगाला चांगले दिवस येतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. मात्र दुर्दैवाने राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कर्जाच्या खाईत, अथवा डबघाईला आले असल्याचे दिसत आहे. याचा फायदा खाजगी साखर कारखानदारांनी उचलला असून शेतकरी वर्गाशी संपर्क वाढविला आहे. आजारी अथवा व्यवस्थापनात ढिसाळ असलेले सहकारी साखर कारखाने शोधत खाजगी साखर कारखानदारांनी अशा ठिकाणी चांगले बस्तान बसवल्याचे दिसते. अलीकडे उभारण्यात आलेल्या अनेक खासगी साखर कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून संगणकीय पद्धतीने अनेक विभागांमध्ये कमी कर्मचारी वर्गात नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असल्याने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा उसाला अधिक भाव देणे शक्य असल्याने आगामी काळात सहकारी साखर कारखान्यांना स्पध्रेला तोंड द्यावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा