विद्यापीठ अनुदान आयोगाने गेली काही वर्षे सुरू केलेल्या रॅगिंग विरोधी चळवळीमध्ये आता स्वयंसेवी संस्थांचे सहाय्य घेतले जाणार असून रॅगिंगबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अँटी रॅगिंग सेलच्या निर्मितीबाबत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरात रॅगिंग विरोधी चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये रॅगिंगविरोधी पथक स्थापन करण्यात यावे. प्रवेश अर्जाबरोबर रॅगिंगसारख्या कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे. प्रत्येक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचनाही विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत. महाविद्यालयांच्या जोडीला आता स्वयंसेवी संस्थांनाही रॅगिंग विरोधी चळवळीमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. आयोगाकडून स्वयंसेवी संस्थाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या संस्थांच्या सहकार्याने देशपातळीवर किंवा स्थानिक पातळीवर रॅगिंग विरोधी मोहीम राबवण्याची आयोगाची योजना आहे. अँटी रॅगिंग सेल स्थापन करण्यातही या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. संस्थांनी २८ नोव्हेंबपर्यंत आपले प्रस्ताव आयोगाकडे पाठवायचे आहेत. या योजनेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका अहवालानुसार यावर्षी राज्यात ४० प्रकार नोंदले गेले आहेत. यामध्ये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रमाणे जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने रॅगिंगसंबंधी तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. याबाबत आयोगाकडून देशपातळीवर नेमण्यात आलेल्या समितीकडून रॅगिंगबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यात येते. या तक्रारींची नोंदही या समितीकडून ठेवली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा