पुणे : स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असताना आता शहराच्या विविध भागांत चार ठिकाणी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी होणार आहे. त्या बदल्यात महापालिका या ठेकेदाराला जाहिरातफलक लावण्याची परवानगी देणार आहे. त्यासाठी मोक्याच्या जागा कंपनीला दहा वर्षांसाठी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहातही खासगीकरणाची पद्धत सुरू होणार आहे.
हेही वाचा >>> शिक्षक भरती प्रक्रियेत किती उमेदवारांकडून प्राधान्यक्रम निश्चित?
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. त्यातच पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण अत्यल्प आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था, सुरक्षेचा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे. महापालिकेला निकषानुसार महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहे उभारणे अडचणीचे ठरत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र त्यामुळे आता ठेकेदारांच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचे नियोजित असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांती देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला दर वर्षी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे टिंगरेनगर रस्त्यावरील जुना विमानतळ रस्ता, विश्रांतवाडी चौक, नगर रस्त्यावरील चंदननगर आणि खराडी गाव येथे नेटवर्क मीडिया सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्या बदल्यात या कंपनीला फर्ग्युसन रस्ता, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर येथील दोन ठिकाणी जाहिरातफलक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. एक जाहिरातफलक ९०० चौरस फुटांप्रमाणे तीन हजार ६०० चौरस फूट जागेवर जाहिरातफलक लावण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाच्या अटी शर्तीनुसार जाहिरातशुल्क आकारणी आणि वसुली कंपनीला करता येणार असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. कंपनीला ही जागा १० वर्षांसाठी देण्यात येणार असून, पहिल्या वर्षी महापालिकेला एक लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळेल. त्यानंतर पुढील प्रत्येक तीन वर्षांनी उत्पन्नात पाच टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. त्यानुसार दहाव्या वर्षी महापालिकेला १ लाख ३८ हजार रुपये मिळणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.