जुनी संस्कृती जपतानाच नव्याचा स्वीकार करणाऱ्या, काळापुढे एक पाऊल टाकून पर्यावरण पूरक उत्सवाची स्वत:पासून सुरुवात करणाऱ्या गणेशभक्तांचे बुधवारी कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’आयोजित ‘इकोफ्रेण्डली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०१३’ या स्पर्धेतील विजेत्यांना मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एच. डी. गंधे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जनकल्याण बँकेच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, सरव्यवस्थापक (टीम रेड) सारंग पाटील, पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाचे माजी ग्रंथपाल शां. ग. महाजन आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून महेंद्र करी यांनी प्रथम पारितोषिक आणि मोनिका रवींद्र महाजन यांना द्वितीय क्रमांक पटकावला. पूर्ती वाणी, सुहास कुलकर्णी, विशाल यादव, अभिजित गणोरकर, अतुल ढाकणे, महेश शिंदे, अर्चना गाडे आणि जगदीश देशपांडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकास ९,९९९ रुपये, द्वितीय क्रमांकास ६,६६६ रुपये आणि उत्तेजनार्थ २००१ रुपये यांसह प्रमाणपत्र व मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या वेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’ ने आयोजित केलेल्या अभिनव संकल्प स्पर्धेमध्ये पुणे विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या स्नेहल कांबळे आणि अक्षता शिंदे यांनाही पारितोषिके देण्यात आली. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गिफ्ट हॅम्पर असे या पारितोषिकांचे स्वरूप होते.
या वेळी गंधे म्हणाले, ‘‘उत्सव या संकल्पनेची निर्मिती ही निखळ आनंद मिळवण्यातून झाली. मात्र, काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. इकोफ्रेण्डली घरचा गणेशोत्सव स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून समाजाला पुन्हा सृजनशील उत्सवाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’’
‘‘या स्पर्धेचा वाढता प्रतिसाद पर्यावरणरक्षणाची गरज असल्याचे लोकांना पटते आहे, याचीच साक्ष आहे. ‘लोकसत्ता’ने नेहमीच पर्यावरणरक्षणाची भूमिका घेतली आहे आणि त्याला सर्वाची साथही मिळाली आहे,’’ असे संगोराम यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रोहित कुलकर्णी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा