पुणे : मातीतल्या कबड्डीला महाराष्ट्राने आपल्या अंगाखांद्यावर खेळवले…मोठे केले…एकापेक्षा एक सरस कबड्डीपटू दिले. त्याच महाराष्ट्राने पुढे बदलत्या स्वरुपात मॅटलाही आपलेसे केले. कबड्डी आणखी फुलवली. केवळ कबड्डी खेळच नाही, तर कबड्डीपटूंनीही मॅटला जवळ केले. प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठाचा त्यांनी सुरेख वापर करुन घेतला आणि आज अकराव्या पर्वात महाराष्ट्राचे खेळाडू लीगचे आकर्षण ठरत आहेत. यु मुम्बाचा अजित चौहान, पुणेरी पलटणचे आकाश शिंदे, पंकज मोहिते यांच्याबरोबरीने एक नाव या पर्वात सर्वांच्या तोडी आहे. ते म्हणजे नगर जिल्ह्यातील टाकळीभान गावातील शिवम पठारे. मातीतून कबड्डीला सुरुवात करुन शिवम मॅटवर सावरलाय आणि मॅटचे वेगळेपण देखिल समजून चुकला आहे. त्यामुळेच आज शिवम मॅटवर टिकण्यासाठी तंदुरुस्ती आवश्यक असल्याचे आग्रहाने सांगतो.
घरातून खेळाचा वारसा मिळालेल्या शिवमला कबड्डीत रुजणे अवघड गेले नाही. वडील आणि काकांपासून कबड्डीचा वारसा घेतला. बहिणीनेही घरचा क्रीडा वरसा घेतला. पण, बहीणने अॅथलेटिक्सची वाट धरली. शिवमने मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले. त्यांच्याकडूनच कबड्डीचे धडे गिरवत शिवम कबड्डीच्या मैदानात उतरला. वडिलांनीच त्याच्यातील चढाईपटू घडवला. कुमार गटातून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारलेल्या शिवमला आता वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा खेळायची आहे. प्रो कबड्डीचे दोन हंगाम गाजवल्यानंतर शिवमला अद्याप महाराष्ट्र संघाचे दरवाजे उघडलेले नसल्याची खंत वाटते. शिवम म्हणाला, ‘मातीतून खेळायला सुरुवात केल्यावर मला मॅटवर स्थिरावण्यासाठी दहा वर्षे लागली. प्रो कबड्डीने माझ्यातील चढाईपटूला पैलू पाडले. कौशल्य वाढले पण, अजून मला राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत नाही. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी आतुर आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी जेव्हा महाराष्ट्राकडून मैदानात उतरेन तेव्हाही अशीच सरस कामगिरी करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.’
प्रो कबड्डी लीगमुळे कारकिर्दीला वेगळे वळण लागल्याचे शिवम मान्य करतो. प्रो लीगमुळे मला मॅटवर स्थिरावण्यास आणि कबड्डीतले बदलते तंत्र अवगत करण्यास मदत झाली. मॅटवरील कबड्डी अधिक वेगवान झाली असून, आता ती माझ्यासह येणाऱ्या पिढीच्या जणू अंगवळणीच पडली आहे. मातीत आणि मॅटवर खेळण्याचा अनुभव एकदम वेगळा होता. मातीत खेळताना ग्रीप घेणे सहज शक्य होते. मॅटवर मिळविण्यासाठी वेळ पहावा लागतो. मातीत खेळणे आता दूर राहिले आहे. मॅट ही काळाची गरज आहे. त्यामुळे मॅटवर खेळणे आता अनिवार्य आहे. पण, मॅटवर खेळण्यासाठी तंदुरुस्ती सर्वात महत्वाची असते आणि जो तंदुरुस्ती राखेल तोच मॅटवर टिकेल, असे शिवम म्हणाला.
हेही वाचा : निर्यात वाढविण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल! थेट उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद
तंदुरुस्तीचा विषय निघाला तेव्हा शिवमने मोकळेपणाने चर्चा केली. शिवम म्हणाला, ‘खेळ आणि तंदुरुस्ती हा समान धागा आहे असे म्हणायला हवे. तंदुरुस्त असल्याशिवाय तुम्ही खेळूच शकत नाही. कबड्डी देखिल याला अपवाद नाही. आधी माती आणि आता मॅटवर खेळत असतानाही तंदुरुस्ती अधिक महत्वाची आहे. दोन्हीमधील फरक इतकाच की मातीवरील दुखापत ती लगेच दिसून येते आणि लवकर भरुन निघते. मॅटवर मात्र दुखापत कळण्यासच वेळ लागतो आणि दुखापत भरुन येण्याचाही कालावधी मोठा असतो. त्यामुळेच जो तंदुरुस्ती टिकवून खेळेल तोच प्रदिर्घकाळ टिकू शकतो. ‘
महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही या लीगचा खूप फायदा झाला हे यंदाच्या पर्वावरून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे अनेक खेळाडू या पर्वात गेम चेंजर म्हणून समोर येत आहेत. शिवमने हे मान्य केले. प्रो कबड्डी लीगमध्ये सातत्याने खेळण्याचा महाराष्ट्राच्या खेळाडूंना फायदा झाला. माझा दुसरा हंगाम असला, तरी मला पहिल्या हंगामानेच इतके शिकवले की मी या वर्षी अधिक आत्मविश्वासाने उभा राहू शकलो. मुख्य म्हणजे दोन्ही वर्षी एकाच संघाकडून आणि एकाच प्रशिक्षकाकडे थांबण्याची संधी मिळाली. मनप्रीत सिंग यांच्यासारखे प्रशिक्षक लाभल्यामुळे मला चढाईतील वेगळी तंत्रे आत्मसात करता आली. जेवढी कबड्डी अधुनिक होत आहे, तेवढे प्रशिक्षणही कठिण होत आहे. पण, मनप्रीत यांनी ते देखिल सोपे करुन आम्हाला खूप चांगले घडवले. यामुळे गुजरातपाठोपाठ हरियाना स्टिलर्सलाही ते सलग दुसऱ्या हंगामात बाद फेरीत घेऊन गेले, असे शिवम म्हणाला.
हेही वाचा : पुणे : दारुच्या नशेत रुग्णवाहिकेवर गोळीबार, व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी
या वेळी सर्वात प्रथम बाद फेरी गाठल्याचा आनंद असला, तरी आता दडपण वाढले आहे. पण, या दडपणाचा फारसा परिणाम होणार नाही. एका वेळेस एक सामना समोर ठेवून आम्ही सराव करत आहोत. बाद फेरी गाठण्याचे उद्दिष्ट सफल झाले. आता अंतिम फेरी गाठणे पुढे उद्दिष्ट असेल, असेही शिवमने सांगितले.