पर्यावरणवादी विरुद्ध विकासवादी असा जो वाद उभा केला जातो तो चुकीचा आहे. मुळातच, पर्यावरण हे विज्ञान आहे. पर्यावरणवादी या शब्दाऐवजी पर्यावरणविचारी असा शब्द वापरला जावा आणि विकासवादी या शब्दाऐवजी विकाससाधक असा शब्द वापरला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी बुधवारी केले.
प्रा. महाजन यांनी आजवर केलेल्या संशोधनाचा, त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि त्यांनी सुरू केलेल्या निसर्गविषयक उपक्रमांचा, चळवळींचा गौरव करण्यासाठी महाजन यांचा महापालिकेतर्फे खास सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन महाजन यांना सन्मानित करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, डॉ. ए. एच. भरूचा, नगरसेवक प्रशांत जगताप, माधुरी सहस्रबुद्धे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहराचा विकास करताना पर्यावरणाचे भान ठेवले पाहिजे. एके काळी टांग्यांचे, सायकलींचे, पेन्शनरांचे म्हणून पुणे ओळखले जात होते. या शहराचा आता अनियंत्रित आणि अस्ताव्यस्त विकास होत आहे. शहरात दरवर्षांला एक लाख लोक बाहेरून येत आहेत. अशा परिस्थितीतही हिरवाईची आरक्षणे उठवून ते भाग निवासी केले जात आहेत. प्रत्यक्षात याच्या उलट कृती झाली पाहिजे म्हणजे पर्यावरण आणि हिरवाई टिकेल, असे प्रतिपादन महाजन यांनी या वेळी बोलताना केले. जैववैविध्य उद्यानाची (बायोडायव्हर्सिटी पार्क-बीडीपी) पुण्याला आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणवादी विरुद्ध विकासवादी असा कोणताही वाद नाही. शब्दप्रयोग करतानाही पर्यावरणवादी ऐवजी पर्यावरणविचारी आणि विकासवादी ऐवजी विकाससाधक असा शब्द वापरला पाहिजे, असेही महाजन म्हणाले.
शहरीकरण वेगाने होत असताना शहरातील आरोग्यदायी जीवनासाठी हिरवाई आवश्यक असून निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळांनी एकत्र येणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे खासदार चव्हाण म्हणाल्या. प्रशांत जगताप यांनी सूत्रसंचालन आणि माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.
‘पर्यावरणवादी शब्दाऐवजी पर्यावरणविचारी शब्द वापरावा’ – श्री. द. महाजन
प्रा. महाजन यांनी आजवर केलेल्या संशोधनाचा, त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि त्यांनी सुरू केलेल्या निसर्गविषयक उपक्रमांचा, चळवळींचा गौरव करण्यासाठी महाजन यांचा महापालिकेतर्फे खास सत्कार करण्यात आला.
First published on: 06-06-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro s d mahajan honoured by pmc