पुणे : राज्यातील विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्‍या समाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) निकालांच्या संभाव्‍य तारखा राज्‍य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केल्या आहेत. त्‍यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी या परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा >>> अकरावीच्या प्रवेशांसाठी यंदा किती जागा उपलब्ध? समोर आली माहिती..

सीईटी सेलकडून या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील प्रवेशांसाठी राज्‍य सीईटी सेलतर्फे घेण्यात आलेल्‍या विविध पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी घेण्यात आल्या. बारावीचा निकाल जाहीर झाल्याने आता विद्यार्थी-पालकांचे लक्ष अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी असलेल्‍या एमएचटी-सीईटीसह पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. एमएचटी-सीईटी या परीक्षेचा निकाल १० जूनला जाहीर होईल. तर बीए आणि बीएस्सी-बीएड या सीईटीचा निकाल १२ जून, पदवीच्‍या हाॅटेल मॅनेजमेंटच्‍या सीईटीचा निकाल ११ जून,  हाॅटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर सीईटीचा निकाल १३ जूनला जाहीर होणार आहे. नर्सिंग आणि पाच वर्षीय एलएलबीच्‍या सीईटीचा निकाल १६ जून रोजी, तर बीसीए, बीबीए, बीबीसीए, बीएमएस., बीबीएम सीईटीचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार असल्‍याची माहिती राज्‍य सीईटी सेलकडून देण्यात आली. सर्व प्रवेश परीक्षांचा निकाल https://www.mahacet.org या संकेतस्‍थळावर जाहीर करण्यात येणार असल्‍याचेही स्‍पष्ट करण्यात आले आहे.