पुण्यातील अंध विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात परीक्षेच्या वेळी लेखनिक न मिळणे, अभ्यास साहित्य उपलब्ध नसणे, प्रवासात होणारी गैरसोय, महाविद्यालयात-विद्यापीठात अंध विद्यार्थ्यांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने येणाऱ्या अडचणी यांचा समावेश आहे.
जागतिक अंध दिन गुरूवारी आहे. त्यानिमित्त पुण्यातील काही संस्था आणि विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेत या समस्या समोर आल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील ‘रौशनी’ आणि फर्गसन महाविद्यालयातील ‘साथी’ हे विद्यार्थी गट या समस्येवर काम करत आहेत. ‘रौशनी’च्या प्रवीण निकमशी बोलताना त्याने सांगितले की,  आम्हाला आलेली पहिलीच अडचण म्हणजे कोणत्याच महाविद्यालयाकडे अंध विद्यार्थ्यांची आकडेवारी नाही. अनेक वेळा तर लेखनिक उपलब्ध करून दिल्यानंतरही अगदी किरकोळ कारणावरून त्यांना अडवले जाते. पुस्तके ब्रेल लिपी मध्ये उपलब्ध करुन देणे आणि ऑडिओ बुक तयार करणे हे कार्य गटातर्फे करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी लागणारी यंत्रणा घेणे शक्य नसल्याने काही संस्थांच्या सहकार्याने ते काम करण्यात येत आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात अंध विद्यार्थ्यांसाठी मदत करणारी यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे.
काही महाविद्यालयात जरी असे गट कार्यरत असले तरी या अंध विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करत शिक्षण घ्यावे लागते. या बाबत बोलताना फर्गसन महाविद्यालयातील विद्यार्थी मारूती म्हणाला,की बरेच अंध विद्यार्थी महाविद्यालयापासून लांब ठिकाणी राहात असल्यामुळे त्यांना दररोज पीएमटी बसने प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि लोकांची असंवेदनशीलता यामुळे ये-जा करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
अंध विद्यार्थ्यांना भेडसावणारी अजून एक मुख्य समस्या उच्च शिक्षणाची आहे. कायद्यानुसार अंध विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत अंध शाळेत राहण्याची परवानगी असते. त्यानंतर  तिथून बाहेर पडल्यानंतर सामान्य विद्यार्थ्यांसारखे उच्च शिक्षण प्राप्त करणे या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. आवश्यक कौशल्याचा विकास झालेला नसतो आणि त्यामुळे उच्च शिक्षणासाठी त्यांना शिक्षण सुविधा मिळू शकत नाही. अंध विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘निवांत अंधमुक्त विकासालय’ या संस्थेच्या संचालिका मीरा बडवे यांनी सांगितले, की अशा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘निवांत’ ही संस्था कार्य करते. इथे पदवीपासून ते पी.एचडी. पर्यंत शिक्षणाचे संपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांसाठी ब्रेलमध्ये उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टय़ा सक्षम करण्यासाठी २२ विषयांमधील अभ्यास शिकविण्यात येतो. संस्थेच्या विद्यार्थ्यांंची स्वत:ची ‘टेक व्हिजन’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि शिकागो येथे कंपनीचे विविध प्रोजेक्ट चालतात, असे देखील त्यांनी सांगितले. एकंदरीतच परिस्थिती पाहता शासन आणि समाजाने या समस्यांकडे डोळसपणे लक्ष देण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा