‘आयटी हब’ म्हणून जगाच्या नकाशावर झळकलेल्या, मात्र तरीही ग्रामपंचायतीच्या हातात कारभार असलेल्या हिंजवडीचा श्वास दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे पुरता कोंडला आहे. अपुऱ्या रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडतो आहे. दररोजच्या या कोंडीमुळे ना केवळ आयटी क्षेत्रात काम करणारे हैराण आहेत, तर हिंजवडीसह लगतच्या पाच-सहा गावांमधील रहिवासीदेखील कमालीचे वैतागले आहेत. वेळेचा अपव्यय, प्रदूषणाचे दुष्परिणाम, मानसिक त्रास, चिडचिडेपणा दररोजचा झाला आहे. सरकारी अनास्थेमुळे गेल्या कित्येक महिन्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा येथे झालेली नाही. पालकमंत्र्यांनी लक्ष घातले, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घातल्या, मात्र, अपेक्षित परिणाम काही झाला नाही.
हिंजवडी गायरान आणि माणच्या विस्तीर्ण परिसरात ‘आयटी पार्क’ची (फेज १, २, ३) उभारणी करण्यात आली आहे. अनेक नामांकित कंपन्यांसह शेकडो छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांचा हा परिसर असून लाखोंच्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून वाहनांच्या रांगा सुरू होतात, दुपारी बारापर्यंत हे चित्र असते. सायंकाळी साडेचार नंतर कार्यालये सुटण्याची वेळ होताच विरुद्ध दिशेने पुन्हा वाहनांच्या रांगा लागतात, त्या रात्री दहापर्यंतही असतात. सकाळी िहजवडीकडे जाणारे सर्व रस्ते जाम होतात व तोच प्रकार सायंकाळी पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीत असतो. दोन ते तीन किलोमीटपर्यंत लांब रांगा आणि कासवगतीने होणारी वाहनांची वाटचाल, हे नेहमीचे चित्र आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे केवळ हिंजवडीकर त्रस्त नसून लगतच्या वाकड, माण, मारुंजी, चांदे, नांदे या गावातील नागरिकही हैराण झाले आहेत. या भागातील व्यावसायिक, हॉटेलचालकांना दररोजची डोकेदुखी आहे. किरकोळ अपघातांची मालिका सुरूच असते. गाडय़ांना गाडय़ा घासणे, ठोकणे हे प्रकार नेहमीचेच आहेत. त्यातून वादावादी व त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी ठरलेली आहे. त्याचा फटका वाहनस्वारांनाच बसतो. या सर्व जोडरस्त्यांपैकी पिंपळे निलखची जगताप डेअरी-वाकड-हिंजवडी या मार्गावर सर्वाधिक ताण आहे. वाहतूक कोंडींची अनेक कारणे सांगितली जातात. बहुतांश कामगारांकडे चारचाकी वाहने आहेत. एकटी येणारी व्यक्तीही चारचाकी वाहन वापरते. एकमेकांना वाहने धडकू नये म्हणून दोन वाहनांमध्ये अंतर राखले जाते. परिणामी, वाहनांच्या दूपर्यंत रांगा लागण्यास निमित्तच मिळते. बहुतांश वाहनस्वार वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, बेशिस्तपणे वागतात. दंड भरू पण वाहतुकीची शिस्त पाळणार नाही, असा त्यांचा बाणा वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरतो. वाहतूक पोलीस अपुरे पडतात. काही इमाने-इतबारे काम करतात तर काहींचे लक्ष फक्त लक्ष्मीदर्शनाकडे असते. रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. मंगल कार्यालयांमुळे लग्नसराईत या अडचणी वाढतात. सध्याची परिस्थिती इतकी भीषण आहे की, दुर्दैवाने मोठी आग लागली किंवा अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रसंग उद्भवला तर कोणीही काहीही करू शकणार नाही. मात्र, याचा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.
लौकिक ‘आयटी हब’चा, वाहतुकीची मात्र रोजची दैना
दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ना केवळ आयटी क्षेत्रात काम करणारे हैराण आहेत, तर हिंजवडीसह लगतच्या पाच-सहा गावांमधील रहिवासीदेखील कमालीचे वैतागले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-01-2016 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of traffic jam at hinjewadi