प्रभागाचे प्रगति पुस्तक
प्रथमेश गोडबोले
कर्वेनगर (प्रभाग क्रमांक – ३१) प्रभागातील शिवणे-खराडी रस्ता आणि डीपी रस्त्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत. डॉ. आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीबाबतच्या प्रस्तावित उपाययोजना, स्वतंत्र भाजी मंडई, रस्ते रुंदीकरण ही कामे सव्वातीन वर्षांनंतरही कागदावरच आहेत. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीत पदपथांवरील अतिक्रमणांची, पथारीवाल्यांच्या अरेरावीची, रस्त्यांवर टेम्पो लावून भाजी विक्री करणाऱ्या विक्रे त्यांची भर पडत आहे. रस्ते रुंदीकरण, स्वतंत्र भाजी मंडई, अतिक्रमणे, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय इमारत तयार असूनही सुरू नाही, याच प्रभागातील प्रमुख समस्या असून त्या नगरसेवकांना सोडवता आलेल्या नाहीत.
भूसंपादन करण्यात असंख्य अडचणी येत असल्याने शिवणे-खराडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पामुळे कर्वेनगर स्मशानभूमी ते नळस्टॉपपर्यंत प्रभागातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. पाणंद रस्त्याचे रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले नाही. डॉ. आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. कर्वेनगर, वारजे, शिवणे या भागात राहणाऱ्या रहिवाशांना या वाहतूक कोंडीचा त्रास होतो.
याबाबतची उपाययोजना अद्यापही कागदावरच आहे. प्रभागात अति उच्चदाब वीज तारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कर्वेनगर भागात दोन मोठे अपघातही झालेले आहेत. राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून उच्चदाब वाहिन्या भूमिगत करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, भूसंपादनाचे कारण सांगत या उपाययोजना रखडल्या आहेत. परिणामी मंजूर अंदाजपत्रक मागे घेण्यात आले आहे. ही समस्या देखील नगरसेवकांना सोडवता आलेली नाही.
प्रभागातील झोपडपट्टय़ांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन रखडले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष मालक वेगळे, काही जागा सरकारी आहे. या वादात हा प्रश्न कायम राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची इमारत तयार असूनही रुग्णालय सुरू झालेले नाही.
नगरसेवकांचे दावे
* दोन उद्यानांचे काम पूर्ण
* आठ वर्षांपासून रखडलेला कर्वेनगर उड्डाणपूल मार्गी
* शहरातील सर्वात मोठा ई-लर्निग स्कू ल प्रकल्प
* डीपी रस्त्यांच्या कामांना गती
* सांडपाणी वाहिन्यांचे जाळे पूर्ण
नगरसेवक
* सुशील मेंगडे * लक्ष्मी दुधाने
* वृषाली चौधरी * राजाभाऊ बराटे
प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे
डॉ. आंबेडकर चौक, हिरकणी कॉलनी, शाहू कॉलनी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, मावळे आळी, कामना वसाहत, स्पेन्सर चौक.
तक्रारींचा पाढा
* डीपी रस्त्यांची कामे रखडलेलीच
* डॉ. आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी नित्याची
* बहुतांश रस्ते अतिक्रमणांनी वेढलेले
* पदपथ, रस्ते अनेक ठिकाणी उखडलेले, खचलेले
नागरिक म्हणतात
प्रभागात अतिक्रमणे वाढलेली असून राजाश्रयाने त्यांना खतपाणीच घातले जाते. अनेक रस्ते उखडलेले असून ते नीट नाहीत. प्रभागात महिलाश्रम, महाविद्यालये असल्याने पायाभूत सुविधांची कामे करणे आवश्यक आहे. कॅ नॉल रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर असून अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे नगरसेवक आणि प्रशासनाचे लक्ष नाही.
– बिभीषण मुंडे, कर्वेनगर
भाजी विक्री करणारी वाहने, टेम्पो रस्त्यामध्येच उभे राहून विक्री करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना त्रास होतो. वस्ती व गल्ली भागातील रस्ते अतिशय अरुंद आहेत आणि त्याप्रमाणात वर्दळ जास्त असल्याने अपघातांची शक्यता आहे. प्रभागातील अनेक रस्ते, पदपथ खचलेले व उखडलेले आहेत.
– बाबुराव धुमाळ, कॅ नॉल रस्ता
राजकीय प्रतिनिधी म्हणतात
प्रभागात झालेली कामे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. वाहतूक समस्या, भाजी मंडईचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. कचरा समस्या, पथारीवाल्यांमुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास कायम आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त कर्वेनगर व परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रभागातील काही उद्याने देखभाल-दुरुस्तीअभावी बंद असून स्थानिक नगरसेवकांकडून याबाबत पाठपुरावा के ल्याचे दिसून येत नाही.
– कैलास दांगट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना</p>
प्रभागातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्ते रुंदीकरणाचे काम रखडले आहे. विशेषत: गावठाणातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. भाजीमंडई नसल्याने अनेक भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसतात, तर टेम्पो घेऊन रस्ता अडवून विक्री करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.
– संजय नांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
लोकप्रतिनिधी म्हणतात
आठ वर्षांपासून रखडलेला कर्वेनगर उड्डाणपूल मार्गी लावला आहे. अशोक विद्यालयाशेजारी नवी ई-लर्निग स्कूल प्रकल्प पूर्ण झाला असून करोनामुळे उद्घाटन कार्यक्रम बाकी आहे. शाहू गल्ली क्रमांक एक येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका, संगीत शाळा बांधली आहे. सारस बागेतील मोनोरेलची प्रतिकृती जावळकर उद्यानात केली आहे. शिवणे-खराडी रस्त्याचे भूसंपादन ९० टक्के पूर्ण केले असून डॉ. आंबेडकर चौक-तिरूपती नगर-डुक्करखिंड या रस्त्यासाठी निधी आणला आहे.
– सुशील मेंगडे, नगरसेवक
२०१७ नंतर प्रभागात दोन उद्याने विकसित केली आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन टेनिस आणि एक बास्के टबॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट असे दोन एकरांत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकु ल विकसित केले आहे. मुख्य मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पूर्ण केले आहे. शहरातील सर्वात मोठी इंग्रजी माध्यमाची ई-लर्निग स्कू लचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिवेज ट्रिटमेंट प्रकल्प मार्गी लावला असून भूसंपादन प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे ड्रेनेजचे पाणी थेट नदीत जाणार नाही. ग्रंथालयाचे कामही सुरू आहे.
– लक्ष्मी दुधाने, नगरसेवक
राजाराम पुलाचे रुंदीकरण व तेथे नव्याने विकसित पदपथ करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पदपथावर विकसित बैठक व्यवस्था, छायाचित्रे काढण्यासाठी खास जागा उपलब्ध होणार आहे. तिरूपती नगर ते डुक्करखिंड ८० फूट रस्ता, आंबेडकर चौक ते दुधाणे लॉन्स या १०० फुटी डीपी रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे, तर पाणंद रस्ता रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रालगत व ८० फूट डीपी रस्त्यालगत सिप्ला फाउंडेशनलगत सीमाभिंत बांधण्यात येणार आहे.
– राजाभाऊ बराटे, नगरसेवक
प्रभागातील सोसायटी भागातील पाणी, ड्रेनेज, रस्त्यांची कामे आणि वाहतूक समस्या सोडवल्या आहेत. वारजे पुलाखाली उद्यान विकसित केले आहे. तसेच डोंगरउतारावरून येणारे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जायचे, त्यामुळे पावसाळी गटारांची योजना मार्गी लागली आहे. कॅनॉल रस्त्यावर अग्निशमन केंद्र प्रस्तावित असून त्याचे काम लवकरच सुरू होईल. हिंगणे होम कॉलनी समाजमंदिर आणि कॅनॉल रस्ता परिसरात महिला सक्षमीकरणासाठी तायक्वांदो क्लासेस सुरू करत आहोत.
– वृषाली चौधरी, नगरसेविका