मंगळसूत्र चोरीला गेले पण त्याचा अद्याप तपास नाही..शंभर नंबरवर फोन केला तर मार्शल पाठवितो म्हणून सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कुणी आलेच नाहीत..ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालय असावे.. रस्ता ओलांडताना अर्धा तास रस्त्यावर थांबावे लागते.. बसच्या पासची वयोमर्यादा साठ वर्षे करावी.. अशा अनेक तक्रारींचा पाढा ज्येष्ठ नागरिकांनी रविवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या समोर वाचला. त्यावर गृहमंत्र्यांनी  ‘‘आजारी, एकाकी, नातेवाईक दूर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी जवळीक वाढवून त्यांच्या कुंटुंबाचा भाग बनण्याचे काम पोलिसांनी करावे,’’ अशा सूचना पोलिसांना दिल्या.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ नागरिकांच्या घरीही जाऊन त्यांनी विचारपूस केली. काही ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले, तर काहींनी तक्रारी मांडल्या. कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस खात्याची आहे. मुंबईनंतर सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक पुण्यात आहेत. मालमत्ता लुटण्यासाठी त्यांच्यावर हल्ले होतात. एकाकी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारण्यासाठी अर्धा तास पोलीस कर्मचाऱ्याला पाठवून देण्याचा उफक्रम मुंबईत सुरू केला आहे. पुण्यातही ज्येष्ठ नागरिकांसाठी असा उपक्रम सुरू केला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचणी येत असलेल्या तक्रारीवर पाटील म्हणाले की, ज्या भागात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस वाढवावेत. त्याच बरोबर जेथे ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम होतात त्यावेळी वाहतूक पोलीस वाढवावेत.

पोलिसांच्या ‘फिक्सिंग’ची गृहमंत्र्यांकडून दखल
‘‘आमच्या सोसायटीमध्ये तीन घरफोडय़ा झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आमच्या शेजारी झालेल्या दोन घरफोडय़ांमधील मुद्देमाल जप्त केला. मात्र, आमच्या घरी झालेल्या घरफोडीचा मुद्देमाल अद्यापही मिळालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी फिक्सिंग केले आहे,’’ अशी गंभीर तक्रार निगडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाने केली. त्याची दखल तातडीने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली. चोर पकडल्यानंतर दोघांचा मुद्देमाल मिळतो, मग तिसऱ्याचा का मिळत नाही, याची गंभीर दखल घेण्याचे आदेश पाटील यांनी दिले.

Story img Loader