लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाजाला सध्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सातत्याने बंद पडणारे इंटरनेट यामुळे कार्यालयात नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे चित्र नेहमीचे झाले आहे. यातच सोमवारी कर्मचारी आंदोलनामुळे कामकाजाला फटका बसला.

मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधाला राज्य सरकारने २३ जानेवारी २०२३ रोजी मान्यता दिली आहे. तरीही सरकारने आकृतीबंध कार्यान्वित केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना आहे. कर्मचाऱ्यांची वर्ग दोनची पदोन्नती ५ ते ६ वर्षे झालेली नाही. याचबरोबर पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती आकृतीबंधाच्या नावाखाली रोखून धरण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी दोन तास निदर्शने करीत लेखणी बंद आंदोलन केले.

आणखी वाचा-पुणे : दिवे घाटात टँकर उलटून दोघांचा मृत्यू; चौघे जण जखमी

पुणे आरटीओ कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आंदोलन केले. आंदोलन दोन तासांसाठी असले तरी आज कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणशी संपर्क साधून अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागला. यातच कार्यालयातील इंटरनेट ठप्प झाले. मागील काही दिवसांत कार्यालयातील इंटरनेट ठप्प होत असल्यामुळे कामासाठी येणारे नागरिकच नव्हे तर कर्मचारीही वैतागले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम आज आरटीओ कार्यालयातील कामकाजावर झाला.

मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आज दोन तास आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपासारखा तीव्र संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. -जगदीश कांदे, कार्याध्यक्ष, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना

आरटीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आज सकाळी आंदोलन झाले. त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला आणि इंटरनेट बंद पडले. त्यामुळे काही काळ काम बंद असले तरी दिवसभर ते सुरळीत होते. -अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी