लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘बंधुतेविना स्वातंत्र्य, न्याय आणि समता कोरडी आहे. स्वातंत्र्य आणि समता आणण्यासाठी कायद्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, बंधुता हृदयातून यावी लागते. समाजातील मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्वाकडे ढकलले जाण्याची प्रक्रिया होत असून, हेच बंधुतेपुढील खरे मोठे आव्हान आहे,’ असे मत विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘राज्यघटनेच्या प्रभावी अंमलबजावणीला बंधुतेच्या विचारांची जोड द्यावीच लागेल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन यांच्या वतीने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात वारे बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे या वेळी उपस्थित होते.

वारे म्हणाले, ‘स्वातंत्र्य आणि समता सर्वांनाच हवी आहे. मात्र, मनाचा सहजभाव असलेल्या बंधुतेबद्दल फारसे बोलले जात नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता याचे आश्वासन देणारी बंधुता धार्मिक, भाषिक, जातीय आणि आर्थिक भेदांतून मुक्त करण्यासाठी रुजवणे गरजेचे आहे. बंधुतेची भावना एकमेकांना आपुलकीच्या भावनेने जोडून ठेवणारी आहे. स्वार्थी आणि क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या काळात बंधुतेचा विचार आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाईल.’

धोंगडे म्हणाल्या, ‘भवतालामध्ये घडणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जाती-धर्माच्या नावावर समाज विभागला जात आहे. आर्थिक विषमता वाढत आहे. अशा वेळी मानवी जीवनात समानतेचा धागा विणून प्रत्येक घटकाला सन्मान देणारा बंधुतेचा विचार अधिक व्यापक व्हायला हवा.’

गोयल, रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने पत्रकार आणि लेखकांना सन्मानित करण्यात आले.