पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून १४१ जागांसाठी १८ हजार ९२४ अर्ज आले आहेत. यापैकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव असून त्यासाठी एक हजार ७७६ महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. महिला आणि माजी सैनिक उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया २३ मेपासून सुरू होणार आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पुणे पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि सहपोलीस आयुक्त व दक्षता अधिकारी संजीवकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. अपर पोलीस आयुक्त अब्दुर रहमान भरतीप्रमुख आहेत. चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, ४६ पोलीस निरीक्षक, ४२ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी आणि ६० मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची या पोलीस भरतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, दररोज दोन हजार उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. साधारणपणे एका उमेदवाराची भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी प्रथम केली जाते. त्यानंतर शंभर गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येते. शंभर मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, डंबेल्स या चार चाचण्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येतात. तर, पाच किलोमीटर धावण्याची पाचवी चाचणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे घेण्यात येते. पोलीस भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जात असून भरतीचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यातील पारदर्शकता वाढविण्यासाठी शारीरिक चाचणीनंतर उमेदवारांना जागेवरच गुण देण्यात येतात. या गुणांची यादी पोलीस मुख्यालयातील फलकांवर लावण्यात येते. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाते.
शहरामध्ये समाविष्ट झालेल्या नव्या गावांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत का असे विचारले असता गुलाबराव पोळ म्हणाले, शहराच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ११ पोलीस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत समाविष्ट भागामध्ये पाच पोलीस ठाणी सुरू करण्यात आली आहेत. ही वाढ ध्यानात घेता आणखी किमान एक हजारांहून अधिक पोलिसांची आवश्यकता भासणार आहे.