लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोणी काळभोर परिसरात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सराइतांनी मिरवणूक काढल्याची घटना हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी ऋषिकेश कामठे (रा. महादेवनगर, मांजरी), त्याचे साथीदार गणेश शिंदे, रोहन शिंदे, अक्षय कांचन, प्रतीक कांचन, प्रकाश होले यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरीतील महादेवनगर भागात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत पोलीस कर्मचारी उमेश शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पुणे स्टेशन परिसरातील दुकानाला आग, दुकानाच्या परिसरातील लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कामठे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी, दरोडा, तसेच लूटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हॉटेल व्यावसायिकाला धमकावून लुटले होते. याप्रकरणी ऋषिकेश कामठेसह साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कामठेसह साथीदारांना २७ जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात नुकताच त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर कामठे आणि साथीदारांनी मांजरीतील महादेवनगर परिसरात मिरवणूक काढून जल्लोष केला. मिरवणूक काढून आरोपींनी परिसरात दहशत माजविली.

आणखी वाचा-कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कामठेसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.