महिला महोत्सवाच्या नावाखाली महापालिकेतील सत्ताधारी दोन्ही काँग्रेसनी मोठी उधळपट्टी केल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. महोत्सवाच्या खर्चाचा तपशील देण्यास महापौर वैशाली बनकर यांनी नकार देताच विरोधी नगरसेविकांनी खर्चाचा तपशीलच सभेत वाचून दाखवला आणि सत्ताधाऱ्यांची उधळपट्टी उघड झाली.
महिला महोत्सवासाठी झालेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याबद्दल मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला होता. त्या वादाचे पडसाद गुरुवारीही सभेत उमटले. सभा सुरू होताच प्रा. मेधा कुलकर्णी, वर्षां तापकीर, पुष्पा कनोजिया यांनी महोत्सवावर झालेल्या खर्चाचा तपशील महापौरांनी द्यावा, अशी मागणी लावून धरली. या महोत्सवावर २५ लाख रुपये खर्च झाले असून त्याची माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. हा वाद वाढल्यानंतर महापौर वैशाली बनकर यांनी ज्या ठेकेदारांना महोत्सवाची कामे दिली होती, त्यांची बिले अद्याप आलेली नाहीत. ती आल्यानंतर खर्चाचा खुलासा केला जाईल, असे सांगून पुढील विषय सुरू करा, असा आदेश नगरसचिवांना दिला.
महापौरांच्या या निवेदनाला विरोधी नगरसेविकांनी जोरदार हरकत घेत या महोत्सवात मोठी उधळपट्टी झाली असा आरोप केला. रुपाली पाटील, मुक्ता टिळक, माधुरी सहस्त्रबुद्धे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत खर्चाचा तपशील मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतरही तपशील देण्यात आला नाही. अखेर प्रा. मेधा कुलकर्णी यांनीच खर्चाचा संपूर्ण तपशील सभेत वाचून दाखवला.
या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली सहा लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यातून महिला सक्षमीकरणाचा कोणता कार्यक्रम झाला, अशी विचारणा त्यांनी या वेळी केली. महोत्सवातील जेवणावर पाच लाख रुपये, मंडपावर दोन लाख रुपये, रोषणाई व विद्युत व्यवस्थेवर तब्बल पावणेसहा लाख रुपये आणि पाहुण्यांची निवसाव्यवस्था, जाहिरात, प्रसिद्धी वगैरेसाठी सहा लाख रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली झालेली ही उधळपट्टी योग्य आहे का, अशीही विचारणा या वेळी विरोधकांनी केली.