पुणे : प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने बायोपॉलिमरसाठीची देशातील पहिली व एकमेव अशी प्रात्यक्षिक सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये स्वदेशी आणि एकात्मिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या पॉलिलॅक्टिक ॲसिड तंत्रज्ञानाद्वारे जैवविघटनशील अशा बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी बुधवारी दिली.

पुण्याजवळील जेजुरीमध्ये उभारण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच झाले. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले आदी या वेळी उपस्थित होते. या अत्याधुनिक प्रात्यक्षिक सुविधेमध्ये पॉलिलॅक्टिक ॲसिड हा पहिलाच विभाग असून, याशिवाय किण्वन, रासायनिक संश्लेषण, विलगीकरण आणि शुद्धीकरण यांसारखे इतर सहायक विभागही उभारण्यात आले आहेत. एकूण तीन एकर परिसरात ही सुविधा असून, यामध्ये वर्षाला १०० टन लॅक्टिक ॲसिड, ६० टन लॅक्टाईड आणि समतुल्य प्रमाणात ५५ टन पॉलिलॅक्टिक ॲसिडचे उत्पादन घेणे शक्य आहे.

आणखी वाचा-बैठ्या जीवनशैलीमुळे जडतेय कायमची पाठदुखी! अस्थिविकारतज्ज्ञांनी सांगितले उपाय…

याबाबत डॉ. चौधरी म्हणाले, की औद्योगिक जैवतंत्रज्ञानात अग्रणी संस्था म्हणून काम करीत असताना चक्रीय अर्थव्यवस्था व जैवआधारित उत्पादनांकडे असलेला जागतिक रोख ओळखून प्राज इंडस्ट्रीजने नजीकच्या काळातील बायोरिफायनरीजचे महत्त्व ओळखले. जैव गतिशीलतेसोबतच जैवइंधन उद्योगात कंपनीने नेतृत्वही प्रस्थापित केले. या कौशल्य व अनुभवाच्या जोरावर प्राजने आपल्या बायो-प्रिझम पोर्टफोलिओद्वारे रिन्युएबल केमिकल्स आणि मटेरिअल्समध्ये (आरसीएम) धोरणात्मकदृष्ट्या विविधता आणली, तेव्हापासून आजवर प्राजने आपल्या प्राज मॅट्रिक्स संशोधन व विकास केंद्रात बायोप्लॅस्टिकला महत्त्व देत पॉलिलॅक्टिक ॲसिड (पीएलए) तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.

आणखी वाचा-दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?

साखर कारखान्यांना उत्पन्नाचे साधन

प्राज इंडस्ट्रीजने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे साखर कारखाने बायोप्लॅस्टिकची निर्मिती करू शकतात. बायोप्लॅस्टिकची निर्मिती कच्च्या साखरेपासून कारखान्यांना करता येईल. यातून त्यांना उत्पन्नाचा नवीन स्रोत उपलब्ध होईल. यातून प्लॅस्टिकला पर्याय निर्माण होऊन त्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही डॉ. चौधरी यांनी नमूद केले.