चित्रपट हे समाज प्रबोधनाचे सशक्त माध्यम असल्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्याचे काम शासनाने केले असून त्यामुळे श्वास, देऊळ सारख्या चित्रपटांनी मराठीची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकली. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाला महाराष्ट्रातच जन्म दिल्याच्या घटनेला शतक पूर्ण होत असताना राज्यात शासनाच्या वतीने आठ ठिकाणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी दिली.
भारतीय चित्रपट निर्मितीच्या शताब्दी वर्षांनिमित्त शासनाच्या सांस्कृतिक विभागाने अलका चित्रपट गृहात आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान, माजी आमदार उल्हास पवार, रामदास फुटाणे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे (फिल्मसिटी) व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एन.चंद्रा, गोविंद निहलानी, अमोल पालेकर, नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होते.
चित्रपट व्यवसायाचे आता उद्योगात रूपांतर झाले असून, नऊ हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि पाच लाख लोकांना रोजगार देणारा हा उद्योग बनला आहे. अशा सशक्त समाजप्रबोधनाच्या माध्यमाला अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडून विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. पटकथा लेखन कार्यशाळा, महाविद्यालयीन तरुणांकडून चांगले चांगले लघुपट बनत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्पर्धा आयोजित केली असून त्यात एक लाख, पन्नास हजार, दोघांना दहा दहा हजार असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार अल्याची माहितीही देवतळे यांनी यावेळी दिली.
जगभर भारतीय चित्रपट पोहचला आहे, तो अधिक व्यापक प्रमाणात जगाच्या समोर जावा म्हणून शासन दादासाहेब फाळके चित्रनगरीत मुंबई आणि कोल्हापूर येथे महत्त्वाकांक्षी योजना आखत असल्याची माहिती सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज मुंबईतील चित्रपट उद्योग भरभराटीला आला असून चित्रपटनगरीसारख्या ठिकाणामुळे या उद्योगाला अधिक चालना मिळाली आहे. देशात अतिशय चांगले चित्रपट, तेवढीच चांगली गुणवत्ता आणि तेही अतिशय कमी खर्चात मराठीत बनत आहेत याचे श्रेयही शासनाला जाते असे ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राने केवळ चित्रपटाची सुरुवात केली असे नाही तर ती जोपासण्यासाठी जे म्हणून प्रयत्न लागतात ते केल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते एन. चंद्रा यांनी यावेळी सांगितले.
—चौकट—
उद्घाटनाआधी बॉम्बस्फोटाच्या अफवा
राज्य सरकारतर्फे अलका चित्रपटगृह येथे भरविण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘कुंकू’ ने होणार होती. मात्र, महोत्सवाच्या उद्घाटनाचे सत्र सुरू होण्यापूर्वी बॉम्बस्फोटाच्या अफवा पसरली. ‘काही तांत्रिक कारणांसाठी सर्वानी १५ मिनिटांकरिता प्रेक्षागृहाबाहेर जावे. थोडय़ा वेळाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे,’ अशी घोषणा करण्यात आली. प्रेक्षक बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी श्वानांकरवी चित्रपटगृहाची तपासणी केली. ही अफवा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. ‘चित्रपटातील कलाकारांनाच या महोत्सवाची माहिती नाही. मग बॉम्ब ठेवणाऱ्याला कसे समजले’, अशी मिश्कील टिप्पणी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केली.