कुंचल्याच्या फटकाऱ्याने कॅनव्हासवर चितारलेले चित्र, मातीच्या गोळ्याला आकार देत घडविलेले शिल्प, यासह तबला, सरोद आणि पखवाज या वाद्यांची जुगलबंदी असा अनोखा आविष्कार कलारसिकांना शुक्रवारी (४ सप्टेंबर) अनुभवता येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर थोपटे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.
हे औचित्य साधून बालगंधर्व कलादालन येथे मंगळवारपासून (१ सप्टेंबर) चार दिवस राज्यभरातील शिल्पकार आणि चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. चित्रकार तुका जाधव यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. श्रीकांत कदम, विकास कांबळे, गिरीश चरवड, संजय टिक्कल, जितेंद्र सुतार, प्रशांत गायकवाड, रमेश गुजर, भास्कर सगर, सुप्रिया शिंदे, प्रदीप शिंदे यांच्या कलाकृती यामध्ये पाहण्यास मिळतील. हे कलाकार कलेचे प्रत्यक्ष सादरीकरणही करणार आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ पखवाजवादक पं. भवानीशंकर, बंडातात्या कराडकर, पांडुरंगमहाराज घुले, महापौर दत्ता धनकवडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार भीमराव तापकीर, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात दिनकर थोपटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार होणार आहे. या वेळी थोपटेसरांची रंगतुला केली जाणार असून हे चित्रकलेचे साहित्य सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे, अशी माहिती अमृतमहोत्सवी समितीचे दीपक थोपटे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा