पुणे : ‘पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता. संतांची शिकवण सांगणाऱ्या वारकऱ्यांकडूनही मंदिर प्रवेशाला विरोध केला जात होता. अशा काळात विठ्ठल सखाराम पागे यांनी चोखोबांच्या मंदिर प्रवेशाची कहाणी सांगणारी पुस्तिका लिहिली. संतांच्या चळवळीमुळे क्रांती शक्य झाली. पागे यांनी हाच धागा पकडून मंदिर प्रवेशासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे काम केले,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.

पागे कुटुंबियांतर्फे विठ्ठल सखाराम पागे यांच्या स्मृतिनिमित्ताने मित्रमंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त उल्हास पवार, सामाजिक कार्यकर्ते अभय भंडारी, माजी आमदार मोहन जोशी, दीपक पायगुडे, प्रकाश पागे, दिलीप पागे आदी या वेळी उपस्थितीत होते. सदानंद मोरे म्हणाले, ‘पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे. चोखोबांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उभारून संत नामदेवांनी भागवत धर्माच्या आधारे मोठी क्रांतीच केली. पूर्वी वर्णाश्रम धर्माच्या, कर्मठांच्या प्रभावात अस्पृश्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, साने गुरुजींनी एक प्रकारे विठ्ठलाचीही यातून सुटका करण्यासाठी लढा उभारला. अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. साने गुरुजींच्या या लढ्यात पागे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी या सगळ्या आंदोलनात समन्वयाचे महत्त्वाचे काम केले. वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी पुस्तकही लिहिले.’

‘चोखोबांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संत नामदेवांनी आणली. मोठी क्रांतीच त्यांनी केली. भागवत धर्माच्या आधारे ही क्रांती नामदेवांनी प्रत्यक्षात करून दाखवली. आता वारकऱ्याला, विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक भाविकालाचंद्रभागेत स्नान करून आल्यानंतर चोखाबाच्या समाधीचे नंतर नामदेव पायरीचे आणि शेवटी विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते. मात्र, आताचे राजकारणी चंद्रभागेत स्नान करून आल्यानंतर पहिले एससी, ओबीसी आणि मग पांडुरंगाचे दर्शन घेतील,’ अशी खंत उल्हास पवार यांनी या वेळी व्यक्त केली. अभय भंडारी यांनी आपल्या मनोगतातून वि. स. पागे यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. ‘पागे हे ज्ञानाचा जीवंत खजिनाच होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सातत्याने त्यांच्या अफाट ज्ञानाचा प्रत्यय येतो,’ असेही भंडारी यांनी सांगितले. पसायदानाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.