पुणे : जर्मन भाषेचे पाच दशके अध्यापन केल्यानंतर प्रा. दिलीप राजगुरू यांनी आपली पहिली कादंबरी मातृभाषा मराठीत न लिहिता थेट जर्मनमध्येच लिहिली आहे. जर्मन भाषेतील एका प्रसिद्ध कादंबरीशी नाते सांगणाऱ्या या कादंबरीत प्रा. राजगुरू यांनी मराठी तरुणाची गोष्ट थेट जर्मन भाषेत सांगितली आहे.
प्रा. दिलीप राजगुरू यांनी लिहिलेल्या आउस देम लेबन आयनेस इंडिशेन टाउगनिषत्स ( फ्रॉम अ लाइफ ऑफ अॅन इंडियन गुड फॉर निथग) या कादंबरीचे प्रकाशन रविवारी पुण्यात ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. एज्युनोव्हा या प्रकाशन संस्थेतर्फे ही कादंबरी प्रकाशित केली जात आहे. केवळ गाणे बजावणे करून दिवसभर झोपा काढणाऱ्या तरुणाला त्याचे वडील पैसे मिळवण्यासाठी बाहेर जायचा सल्ला देतो आणि त्यानंतर त्या मुलाच्या आयुष्यात घडते ते फ्रॉम द लाइफ ऑफ अ गुड फॉर निथग या कादंबरीत योसेफ फॉन आइशेनडोर्फ यांनी मांडले आहे. जर्मनमधील हा कादंबरी विख्यात आहे. याच कादंबरीपासून प्रेरणा घेत प्रा. राजगुरू यांनी आपला प्रवास कादंबरीच्या माध्यमातून जर्मन भाषेत मांडला आहे. प्रा. राजगुरू स. प. महाविद्यालयात जर्मन विभागप्रमुख होते, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात आणि मॅक्समुलर भवन-ग्योएथे इन्स्टिटय़ूटमध्येही त्यांनी दीर्घकाळ जर्मनचे अध्यापन केले आहे. जर्मनमध्ये कादंबरी लिहिण्याविषयी प्रा. राजगुरू म्हणाले, की माझ्या घरात कला, साहित्य, संस्कृतीविषयक वातावरण होते. माझ्या मोठय़ा भावाची काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मलाही लहानपणापासून लिहिण्यात रस होता. जर्मन भाषा शिकल्यावर, अध्यापन करू लागल्यावर काही जर्मन कथांचा मराठीत अनुवाद केला, मराठीत काही लेख लिहिले. पण स्वत:चे कथात्म साहित्य लिहिलेले नव्हते. त्यामुळे कादंबरी लिहिण्याचा, तीही जर्मनमध्ये लिहिण्याचा विचार नव्हता. कॅनडाला मुलीकडे राहायला गेलो असताना वेळ घालवण्यासाठी म्हणून माझा आजवरचा प्रवास कादंबरीच्या रुपात मांडायला सुरुवात केली. त्यानंतर जवळपास अडीच वर्षे या कादंबरीचे लेखन सुरू होते. जसजसे लेखन होईल तसे जर्मन मित्रांना दाखवून माझे जर्मन त्यांना कळते हे समजून घेतले आणि त्यांच्या प्रतिसादानुसार बदल करून ही कादंबरी लिहिली.
पहिली कादंबरी प्रकाशत होत असल्याचा आनंद आहे. आता ही कादंबरी मराठीत लिहिण्याचाही विचार असल्याचेही प्रा. राजगुरू यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांकडून पुस्तक रूप, जर्मन व्यक्तींकडून संपादन
प्रा. राजगुरू यांच्या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे, जर्मन भाषेच्या त्यांच्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन या कांदबरीला पुस्तक रूप दिले आहे, तर डॉ. योहाना रोथ मायर आणि राईन होल्ड शाईन या जर्मन भाषेच्या जर्मनीतील प्राध्यापकांनी कादंबरीचे संपादन केले आहे.