दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या खास मर्जीतील म्हणून भाजप वर्तुळात ज्यांची ओळख आहे, ते राज्यसभा खासदार अमर साबळे हे ‘गोपीनाथगडा’च्या लोकार्पण सोहळ्याकडे फिरकले नाहीत. दिवसभर पिंपरी-चिंचवडमध्ये असूनही ते या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने भाजप वर्तुळात भलतीच कुजबुज सुरू झाली असून अनेक तर्कवितर्कही लढवण्यात येत आहेत.
परळीत वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या ‘गोपीनाथगडा’चे उद्घाटन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री, पदाधिकारी व राज्यभरातील मुंडे समर्थक या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुंडे यांचे प्रभावक्षेत्र राहिलेल्या पिंपरी-चिंचवड भाजपातून अनेक कार्यकर्ते गेले होते. मात्र, दिवसभर शहरात असूनही साबळे तिकडे गेले नाहीत, यावरून पक्षवर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. साबळे यांच्या राजकीय प्रवासात मुंडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मुंडे यांना दैवत मानणारे साबळे ‘गोपीनाथगडा’च्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने पक्षात तो चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात, अधिकृतपणे बोलण्याचे पक्षातून टाळण्यात आले. मात्र, पक्षवर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे

Story img Loader