सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती
पिंपरी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदीत अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात शनिवारी (१८ जून) व रविवारी (१९ जून) हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
त्याअंतर्गत संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ज्ञानियांचा राजा’ या कार्यक्रमाचे १८ व १९ जूनला आयोजन करण्यात आले आहे. आळंदीतील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड हे सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार आहेत. याशिवात दररोज हरिपाठ, व्याख्यान, किर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तीगीते, भारुड, दिंडी आदी कलांचा अविष्कार पाहता येणार आहे.
शनिवारी हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर संतांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान सादर हाईल. अक्षय महाराज भोसले यांच्या किर्तनासह भारुड, अभंगगीत, भक्तीगीत हे कार्यक्रमही होतील. रविवारी हरिपाठानंतर श्री स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. समर्थ पाटील हे भजन सादर करतील. प्रमोद महाराज जगताप कीर्तन करणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावार आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत. भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान आदी कार्यक्रम सादर करणार आहेत.
या आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.