‘नादरूप’ संस्थेतर्फे शास्त्रीय नृत्याच्या समन्वयातून महाभारताचा पट उलगडला जाणार आहे. वेगवेगळ्या सात शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश असलेली ‘अतीत की परछाईयाँ : महाभारत की पुनखरेज’ ही वैशिष्टय़पूर्ण नृत्यसंरचना २८ फेब्रुवारी रोजी एमआयटीच्या मैदानावर सादर केली जाणार आहे.
‘अतीत की पराछाईयाँ : महाभारत की पुनखरेज’ या नृत्यसंरचनेमध्ये कथक, भरतनाटय़म, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम, कुचिपुडी आणि छाऊ या वेगवेगळ्या सात शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश आहे. रमली इब्राहिम, वैजयंती कासी, गोपिका वर्मा, डॉ. कन्नन, वैभव आरेकर, राकेश साई बाबू आणि अमीरा पाटणकर या प्रमुख कलाकारांसह २० नृत्यकलाकारांचा संच या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे, अशी माहिती ‘नादरूप’ संस्थेच्या शमा भाटे यांनी दिली.
मानवी जीवनातील गुंतागुंतीचा सर्वागाने वेध घेणारे महाभारत हे खऱ्या अर्थाने महाकाव्य आहे. पराकोटीचे दु:ख, औदार्य, सूड, सहानुभूती, विफलता आणि शांतता या साऱ्यांचा अनुभव यामध्ये मिळतो. या नृत्यसंरचनेमध्ये महाभारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांना एकत्र गुंफण्यात आले आहे. या व्यक्तिरेखा त्यांच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यावर आहेत. त्यांच्या जीवनात प्रचंड मोठी उलथापालथ झाल्यानंतर आपल्या सर्व प्रिय व्यक्ती आणि संपत्तीचा नाश झाल्यावर ते मागे वळून पाहत आपल्या जीवनाचे तटस्थपणे परीक्षण करीत आहेत. अचानकपणे त्यांना तो विजय निष्फळ आणि पराभव निर्थक वाटू लागतो. नाटय़मय ‘कथकली’तून भीष्म, ‘छाऊ’तून आक्रस्ताळा आणि शीघ्रकोपी दुयरेधन, ‘कुचिपुडी’तून सहनशील कुंती, ‘मोहिनीअट्टम’मधून गांधारी, ‘ओडिसी’तून धोरणी युधिष्ठिर, ‘भरतनाटय़म’मधून कर्ण आणि ‘कथक’मधून द्रौपदी या व्यक्तिरेखा वेशभूषा आणि संगीतासह वैविध्यपूर्ण शैलीतून महाभारताच्या कथानकाचा पट मांडणार आहेत. महाभारताची इतक्या वेगळ्या पद्धतीने मांडणी कदाचित प्रथमच होत असावी, असेही शमा भाटे यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा