आज संगणक व मोबाइलचे युग आले असले, तरी वेगवेगळे शास्त्र व विज्ञान जगाला देणाऱ्या सनातन धर्माच्या संस्कृतीला व सिद्धांतांना दूर ठेवून प्रगती शक्य होणार नाही, असे मत पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी बुधवारी व्यक्त केले.
हिंदूू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत शंकराचार्य बोलत होते. ते म्हणाले, की सनातन संस्कृतीने जगाला अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, मोक्षशास्त्र आदी शास्त्रांसह गणित व विज्ञान दिले. पृथ्वी, पाणी, प्रकाश, आकाश हेही त्या सिद्धांताचे पालन करतात. त्या सनातन सिद्धांताला दूर ठेवता येणार नाही. त्याची उपेक्षा करून प्रगती साध्य होणार नाही. विकासाच्या नावावर जगाला अंधारामध्ये भरकटविले जात आहे. सनातन संस्कृती व विज्ञान परंपरेपासून आपल्याकडे आहे, मात्र आपणही त्याच अंधारात भरकटत आहोत, याचे आश्चर्य वाटते. आजची शिक्षण व्यवस्थाही दिशाहीन आहे. त्यामुळे ती मनुष्याचा विकास साध्य करू शकत नाही.
सनातन संस्कृतीला अंधश्रद्ध म्हणणे म्हणजे स्वत:लाच अंध समजण्यासारखे आहे, असे सांगून ते म्हणाले, की यावर चर्चा झाली पाहिजे. त्यानंतरच कोण दुर्बल व कोण प्रबल आहे, ते ठरेल. वैचारिक पातळीवर विचार केल्यास आज आपण विश्वविजेता आहोत. राजकीय पातळीवर संस्कृतीनुसार शासन व्यवस्था नाही, हीच एक मोठी कमतरता आहे. सनातन धर्म व संस्कृतीनुसार शासन व्यवस्था असल्यास सनातन संस्कृतीमध्ये कोणतीही कमतरता नाही, हे दाखविले जाईल.
सध्या विकासाच्या नावावर मोठे षडयंत्र सुरू आहे. विकासाच्या नावावर गंगेचा द्वेष केला जात आहे. गोरक्षा करणाऱ्यांनाच राष्ट्रदोही समजले जाते. हेच या देशाचे स्वातंत्र आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader