लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार १८ मतदान केंद्रे आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात होतो. पुणे पोलिसांकडून पुणे लोकसभा, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांच्या परिसरात शंभर मीटर परिसरात मोबाइल संचाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-पुणे : महिलेच्या खूनाचा झाला उलगडा; अत्याचारास विरोध केल्याने गळा दाबून खून
मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्वलनशील वस्तू, शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह, त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.