लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत या भागात प्रतिबंधात्माक आदेश लागू राहणार आहेत.

कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर, कोथरुड, पर्वती, खडकवासला या मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात शनिवारी पार पडणार आहे. मतदान संपल्यानंतर मतपेट्या बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामाच्या परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र, तसेच परिसरात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाइल संच, लॅपटॉप, कॉर्डलेस दूरध्वनी, तसेच बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात काडीपेटी नेण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-कात्रज भागात जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा

मतमोजणी केंद्राच्या परिसरात खासगी संस्था, संघटनेकडून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई घालण्यात आली आहे. छापील मजकूर चिटकवणे, तसेच प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात शासकीय वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. अधिकृत ओळखपत्राशिवाय (पास) मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही, असे त्यांनी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibitory orders in counting centers area of koregaon park area pune print news rbk 25 mrj