निवडणुकांच्या तोंडावर पालिकेच्या खर्चाने राष्ट्रवादीचा  प्रचार

दहा वर्षांत सत्तेच्या माध्यमातून केलेला शहराचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीने निवडणुकीच्या दृष्टीने रणिशग फुंकले आहे. त्याच वेळी ‘विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादीचा प्रचंड भ्रष्टाचार’ यावरून विरोधकांनी रान उठवण्याची व्यूहरचना केली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावरच प्रारंभ करण्यासाठी राखून ठेवलेल्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका लावण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली असून, येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यात पालिकेच्या खर्चाने होणाऱ्या ‘भव्यदिव्य’ कार्यक्रमांद्वारे राष्ट्रवादीचा निवडणूक प्रचार होणार आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये िपपरी पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या डोळय़ांसमोर ठेवून राष्ट्रवादीने विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचे नियोजन केले आहे. मतदारांवर प्रभाव पडेल, अशा मोक्याच्या क्षणी हे कार्यक्रम व्हावेत, यादृष्टीने राष्ट्रवादीने व्यवस्थित नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले पाहिजे, असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह असतो. विरोधी पक्षाच्या बडय़ा नेत्यांना आमंत्रित केले जात नाही, स्थानिक नेत्यांना फारशी किंमत दिली जात नाही. यामागे राष्ट्रवादीचे श्रेयाचे राजकारण आहे. अजित पवारांचे अलीकडेच पाच दौरे झाले. शेवटच्या दौऱ्यात चापेकर स्मारक अनावरणासह पालिकेच्या विविध प्रकल्पांची सुरुवात त्यांच्याच हस्ते झाली. २४ जुलैला ते पुन्हा येणार आहेत, तेव्हाही उद्घाटनांची मॅरेथॉन होणार आहे. आगामी तीन महिन्यांत राष्ट्रवादीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करून ठेवले आहे. अजितदादांच्या सोयीने ठराविक दिवसांच्या अंतराने हे कार्यक्रम होणार आहेत.

देहू-आळंदी रस्त्याचे उद्घाटन, सांगवीतील उड्डाणपूल, वाय जंक्शन ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन, केएसबी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन, एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उद्घाटन, दिघी-आळंदी रस्त्याचे उद्घाटन, संभाजीनगर, िपपरीगाव, चऱ्होली तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावाचे उद्घाटन, िपपळे गुरव-काटेपूरम येथील नाटय़गृहाचे उद्घाटन, दापोडी ते निगडी कॉरिडॉरचे उद्घाटन, २९ किलोमीटरच्या वर्तुळाकार वेगवान रस्त्याचे भूमिपूजन, चिखलीतील संतपीठाचे भूमिपूजन व शाळा-रुग्णालयाचे उद्घाटन, िपपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहाचे उद्घाटन, थेरगाव येथील हॉस्पिटलचे भूमिपूजन व भोसरी रुग्णालयाचे उद्घाटन, अजमेरा कॉलनीतील नेत्र रुग्णालयाचे भूमिपूजन, औद्योगिक गाळे ‘टी २०१’चे उद्घाटन, संत तुकारामनगर येथील उद्यान व व्यापारी संकुलाचे उद्घाटन, संभाजीनगरच्या बस टर्मिनसचे उद्घाटन, सांगवी शिवसृष्टीत बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन, जोग महाराज उद्यानाचे नूतनीकरण आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे भूमिपूजन अशा नियोजित कार्यक्रमांची भलीमोठी यादी तयार आहे. या माध्यमातून पालिकेच्या खर्चाने राष्ट्रवादीचा निवडणूक प्रचाराचा धडाका दिसणार आहे, हे उघड गुपित आहे.