पुण्यातील विद्याव्हॅली प्रशालेतील शिक्षिका सीमा शर्मा यांनी नुकतीच ध्रुवीय प्रदेशाचे अभ्यासक रॉबर्ट स्वान यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय अंटाक्र्टिका मोहीम केली. ‘प्रोजेक्ट सर्च’ या उपक्रमांतर्गत त्यांना ही संधी मिळाली होती.
पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोजेक्ट सर्च हा उपक्रम आखण्यात आला आहे. टेरी आणि टेट्रापॅकने मिळून २००९ मध्ये हा उपक्रम सुरू केला. विविध माध्यमांतून तयार होणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम यांबाबत विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत ‘गो साऊथ’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये शर्मा यांनी कचऱ्याचा पुनर्वापर या विषयावर सादरीकरण केले होते. या स्पर्धेमध्ये शर्मा या विजेत्या ठरल्या असून त्यांना रॉबर्ट स्वान यांच्याबरोबर अंटाक्र्टिका मोहिमेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या मोहिमेमध्ये त्यांनी १२ हजार ५० मैलाचा प्रवास केला.
सीमा शर्मा या विद्याव्हॅली स्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका आहेत. त्या शिवाय शाळेतील पर्यावरण विषयाच्या समन्वयक म्हणूनही त्या काम करताता. या मोहिमेच्या माध्यमातून तापमान वाढीचे परिणाम जवळून पाहता आले असून प्रोजेक्ट सर्चच्या माध्यमातून कचऱ्याचा पुनर्वापर, पर्यावरणपूरक राहणीमान यांबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.