दत्ता जाधव

पुणे : रसायनमुक्त आहाराविषयी शहरी ग्राहकांमध्ये जागृती झाल्यामुळे सेंद्रिय खाद्यपदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून सेंद्रिय किंवा रसायनमुक्त गुळाची बाजारातील उत्पादने वाढली आहेत. नुकत्याच संपलेल्या हंगामात गूळ उत्पादकांनी कमीतकमी रसायनांचा वापर करून गूळ निर्मितीवर भर दिल्याचे दिसून आले. पण, हा गूळ पूर्णपणे रसायनमुक्त नाही. रसायनमुक्त गुळाच्या नावाखाली ग्राहकांची शुद्ध फसवणूक सुरू आहे. या भेसळयुक्त, रसायनयुक्त गूळ उत्पादनांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

ग्राहकांकडून सेंद्रिय, रसायनमुक्त गुळाची मागणी वाढल्याचा परिणाम म्हणून बाजारात सेंद्रिय गुळाची उत्पादने मोठय़ा प्रमाणावर वाढली आहेत. लहान-मोठय़ा ढेपा, लहान वडय़ा, गूळ पावडरच्या विविध उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. वेष्टनांवर सेंद्रिय, रसायनमुक्त, असा उल्लेख करून बाजारात नवनवी उत्पादने येत आहेत. काही कंपन्यांनीही सेंद्रिय गुळाचे खडे, गूळ पावडर बाजारात आणली आहे. मात्र, हा गूळ पूर्णपणे सेंद्रिय असूच शकत नाही. सेंद्रिय किंवा रसायमुक्त गुळाच्या नावाखाली ग्राहकांची शुद्ध फसवणूक सुरू आहे.

शिराळा (जि. सांगली) येथील गूळ उत्पादक सुभाष खंडू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शिराळा परिसरात पाचसहा वर्षांपूर्वी पन्नासहून अधिक गुऱ्हाळघरे होती. महापुरानंतर त्यांना उतरती कळा लागली आहे. तालुक्यात केवळ दोन गुऱ्हाळघरे आहेत. या गुऱ्हाळघरातून पूर्वी काकवीतून मळी (गुळाच्या रसातील काळा कचरा, लहान पाचटे) बाजूला काढण्यासाठी भेंडी आणि चुना वापरून गूळ तयार केला जायचा. आता भेंडी मिळत नाही. बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेल्या भेंडी पावडरचा वापर केला जातो. पण त्यात भेसळ असते. आजही भेंडी पावडर, चुना, फॉस्फरस याचा वापर करूनच गूळ तयार केला जातो.

कर्नाटकी गुळात भेसळ

कर्नाटकमधून कोल्हापूर, सांगलीच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर गुळाची आवक होते. त्यात साखर, गंधक, फॉस्फरस, चुना, मागणीनुसार कृत्रिम रंग, गूळ कडक होऊ नये म्हणून काही प्रमाणात विशिष्ट प्रकारचे आम्ल वापरले जाते, अशी माहिती कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचे व्यापारी निमेष वेद यांनी दिली. कोल्हापूर, सांगली, कराड परिसरात गुळातील रसायनांचे प्रमाण आणि भेसळ कमी असते. मात्र, कर्नाटकमधून येणाऱ्या गुळात मोठय़ा प्रमाणावर भेसळ असते. अशीच भेसळ पुण्यातील दौंड परिसरातील गुऱ्हाळ घरातून होत असल्याचेही पुणे बाजार समितीतील व्यापाऱ्याने सांगितले.

‘१०० टक्के सेंद्रिय’ ही दिशाभूल

सेंद्रिय गूळविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या काही कंपन्यानी गूळ तयार करताना कमीतकमी रसायनांचा वापर करावा, साखरेचा, कृत्रिम रंगाचा वापर करू नये, अशा अटी घालून काही गुऱ्हाळ मालकांशी करार केले आहेत. या कंपन्या पूर्णपणे रसायनमुक्त गुळाची जाहिरात करतात पण, सध्या राज्यात १०० टक्के रसायनमुक्त, सेंद्रिय गूळ तयार करणे अशक्य असल्याचे गुऱ्हाळ मालक सांगतात.

भेसळयुक्त गूळ कसा ओळखावा?

रसायनमुक्त गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याची अनेक उत्पादने बाजारात आली आहेत. रसायने कमी वापरलेला गूळ रंगावरून, चवीवरून ओळखता येतो. जास्त आकर्षक, चकचकीत, लाल भडक, जिलेबी रंगाच्या गुळात भेसळ, रसायने, कृत्रिम रंग जास्त असतात. काळसर रंगाच्या गुळात कमी रसायने असतात, असे पुण्यातील गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

कोल्हापूर बाजार समितीत एका हंगामात सुमारे २०० कोटी रुपये किमतीच्या गुळाची आवक होते. यापैकी साधारण ४० टक्के गूळ सेंद्रिय म्हणून विकला जातो. वेष्टनावर तसे लिहिलेले असते. प्रत्यक्षात हा गूळ सेंद्रिय नसतो. या हंगामात सेंद्रिय गुळाची अनेक उत्पादने बाजारात आली आहेत. 

– निमेष वेद, गुळाचे व्यापारी, कोल्हापूर