पुणे : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींनी तयार केलेली बेकरी उत्पादने, कापडे, दागिने अशी विविध उत्पादने ‘संस्कृता’ या दालनाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित असून, येत्या शैक्षणिक वर्षात या दालनाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश चव्हाण यांनी ही माहिती दिली.

‘संस्कृता’ दालनामध्ये न्यूट्रिशन अँड डायेटेटिक्स, फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल, टेक्सटाईल सायन्स अँड अपॅरेल डिझाईन, ह्युमन डेव्हलपमेंट, इंटिरियर डिझाईन, ह्युमन इकॉलॉजी अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस अशा सर्व शाखांतील उत्पादने या दुकानात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ‘संस्कृता’ या दालनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना त्यांचे कौशल्य दाखवण्याची, नैसर्गिक आणि पारंपरिक उत्पादने मांडण्याची संधी मिळणार आहे. गृहविज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनी अन्न व पोषणशास्त्र शिकतात. त्यामुळे प्रकल्पांसाठी त्या नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करतात. ही उत्पादने महाविद्यालयाच्या पलीकडे सर्वसामान्य नागरिकांपर्यंतही पोहोचाव्यात, विद्यार्थिनींना उद्योजकतेचे पैलू समजावेत, अशी कल्पना आहे. त्यामुळे कर्वे रस्त्यालगत दालन सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

प्रा. चव्हाण म्हणाले, ‘गृहविज्ञान अभ्यासक्रम हा केवळ स्वयंपाक आणि खाद्यपदार्थांशी संबंधित नाही. तर, त्यात विद्यार्थिनींमध्ये उपयुक्त कौशल्य आणि त्यांना सक्षम करणारा शास्त्रीय अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थिनी प्रत्येक उत्पादनासाठी आराखडा तयार करतील, डिझाईन बनवतील, खर्चाचा अभ्यास करतील, बाजारपेठेतील स्पर्धेचे विश्लेषण करून उत्पादनांच्या किमती निश्चित करतील. तसेच, आगाऊ मागणी नोंदवून घेऊन त्याची पूर्तताही करतील. या सर्व व्यवहाराचे बारकाईने लेखापरीक्षण करून ग्राहकांना काय आवडते, काय आवडत नाही हेही त्यांना समजेल. त्याचा उपयोग त्यांना स्वयंपूर्ण उद्योजक होण्यासाठी होईल.’