पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी ३२ दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. तर, सुमारे ७०० खासगी रुग्णालये आणि अडीच हजार लहान दवाखाने आहेत. ही रुग्णालये व दवाखान्यांतून एका दिवसात साडेतीन ते चार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो. हा जैववैद्यकीय कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे या कामासाठी ‘पास्को’ या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेकडून दररोज जैववैद्यकीय कचऱ्याचे संकलन केले जाते. हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. मोशीतील प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
नेमकी समस्या काय आहे?
शहरातील रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती होते. महापालिका हद्दीतील रस्त्यालगत, पदपथावर, नदीपात्राच्या कडेला जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. गोळ्या, औषधे, इंजेक्शनच्या सीरिंज असा कचरा टाकला जातो, असा नागरिकांचा आरोप आहे. मोशी, चिखली, सांगवी, नवी सांगवी परिसरातील काही दवाखाने, औषध दुकानदारांकडून जैववैद्यकीय कचरा नदीपात्रालगत मोकळ्या जागेत टाकला जात आहे. तसेच, प्लास्टिक पिशवीत भरून रस्त्यावरदेखील फेकला जात असल्याचे निदर्शनास आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोशीत प्रक्रिया
महापालिकेच्या पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दररोज दोन टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारे केंद्र होते. हे केंद्र २०२२ मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर मोशी येथील जागेत ऑगस्ट २०२३ मध्ये प्रतिदिन १७.९ टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले केंद्र सुरू करण्यात आले. येत्या १२ वर्षांचा विचार करून संबंधित केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी सध्या रुग्णालयांकडून प्रतिदिन प्रतिखाट ८.१६ रुपये दर आकारला जातो. तर, दवाखान्यांसाठी चार हजार ३९ रुपये इतके वार्षिक शुल्क घेण्यात येत आहे. पिवळा, लाल, निळा, पांढरा अशा चार प्रकारांत जैववैद्यकीय कचऱ्याची वर्गवारी केली जाते. काही कचरा जाळला जातो. तर, काही कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करून भुगा केला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते.
नागरिकांचे म्हणणे काय?
नवी सांगवीतील एम. एस. काटे पदपथावर वापरलेली इंजेक्शन सीरिंज, सुया, औषधांनी अर्धवट भरलेल्या बाटल्या असा जैविक कचरा रस्त्याच्या कडेला आढळून आला. हा कचरा आठ दिवस रस्त्यावर पडून होता. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तो उचलला. मात्र, ज्याने कचरा आणून ठेवला, त्याचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राजू सावळे यांनी केली आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय?
जैववैद्यकीय कचरा पदपथ, मोकळ्या जागा, रस्त्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. ३५ हजार रुपये दंड आकारला जातो. जैववैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी १ एप्रिल २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एक लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.