पुणे : करोनापश्चात पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनी मालमत्ता खरेदी-विक्रीकडे मोर्चा वळविला आहे. चालू आर्थिक वर्षात केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल साडेसहा हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. केवळ चालू महिन्यात (मार्च) तब्बल ६५७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन वर्तुळाकार रस्ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, रोजगाराची हमी अशा विविध घटकांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांकशुल्क विभागाने नोंदविले आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२२ ते आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त दस्त नोंद झाले आहेत. त्यातून साडेसहा हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एक लाख ७० हजार १६२ दस्त नोंद झाले. त्यातून शासनाला ४२७१.७५ कोटींचा महसूल प्राप्त झाला. डिसेंबर २०२२ या महिन्यात २४ हजार २३४ दस्त नोंद होऊन ७९९.६८ कोटींचा महसूल मिळाला. जानेवारी २०२३ या महिन्यात २३ हजार ९५७ दस्त नोंद होऊन ६५१.२१ कोटींचा महसूल प्राप्त झाला. चालू आर्थिक वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसाठी राज्य शासनाने ५८८० कोटी महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण होऊन त्यापेक्षा अधिकचा महसूल मिळविण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले आहे.
हेही वाचा – पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री; ११४ गॅस सिलिंडर जप्त
मार्च महिन्यात ६५७ कोटींचा महसूल
चालू महिन्यात १४ ते २१ मार्च या कालावधीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांपैकी काही कार्यालयांचे कामकाज ठप्प होते. त्याचा परिणाम दस्तनोंदणीवरही झाला. तसेच दर वर्षी १ एप्रिलपासून नवे चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) लागू होतात. त्यामुळे मार्च महिन्यात दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असते. यंदा १ ते २४ मार्च या कालावधीत १९ हजार २८९ दस्त नोंद होऊन तब्बल ६५७ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.