पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीची कार्यवाही सुरु आहे. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  केवळ १८ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. हीच बाब लक्षात घेऊन  महापालिकेची मुख्य कार्यालय तसेच १८ विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १८ विभागीय कार्यालये कार्यान्वीत आहेत. कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने कर भरण्याची सुविधा विभागीय कर संकलन कार्यलयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  आत्तापर्यंत ८३१ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे,  यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी करसंकलन विभागाकडून टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे.

नागरिकांनी शनिवारी व रविवारी महानगरपालिकेकडून ८८८८००६६६६ सदर क्रमांकावरुन आलेले फोन अधिकृत असून त्याचबरोबर, @CP-PCMCPT @CP-PCMCWT या हॅंडलवरुन आलेले एस.एम.एस अधिकृत समजावेत, असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.  नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.

शनिवार आणि रविवार महापालिकेला सुट्टी असली तरी ३१ मार्चपर्यंत या दोन्ही दिवशी कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत.  नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे. दि. ३१  मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाचा निर्णय !

चालू आर्थिक वर्ष संपायला काहीच दिवस बाकी आहेत. करसंकलन विभागाकडून करवसुलीसाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील १८ विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ताकराचा भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जाभंळे – पाटील यांनी केले आहे.

Story img Loader