पुणे : शहरातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) मिळकतकर बिलांचे वाटप एक मे पासून सुरू केले जाणार आहे. निवासी मिळकतींना ४० टक्के सवलत देण्यासाठी महापालिकेकडून भरून घेण्यात आलेल्या पीटी-३ अर्जाची छानणी करून त्याच्या नोंदी प्रलंबित असल्याने १ एप्रिलपासून बिलांचे वाटप करणे अशक्य आहे. त्यामुळे एक मे पासून नागरिकांना बिले दिली जातील, असे महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले. नागरिकांना ३० जूनपर्यंत पाच ते दहा टक्के सवलतीचा फायदा घेऊन ३० जूनपर्यंत मिळकतकर भरता येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महापालिकेचे आर्थिक वर्ष सुुरू झाल्यानंतर एक एप्रिलपासून मिळकतकरदारांना बिलांचे वाटप केले जाते. त्यानंतर ३१ मे पर्यंत महापालिकेने जाहीर केलेल्या योजनांचा फायदा घेऊन नागरिकांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलतीचा फायदा घेत मिळकतकर भरता येतो. ज्या मिळकतींमध्ये जागामालक स्वत: राहत असतील अशा नागरिकांना राज्य सरकारच्या आदेशानुसार ४० टक्के सवलत दिली जाते. यासाठीचे पीटी-३ क्रमांकाचे अर्ज महापालिकेने नागरिकांकडून भरून घेतले आहेत. सर्वसाधारण दीड ते पावणेदोन लाख अर्ज महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांकडे नागरिकांनी भरून दिलेले आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने याच्या नोंदी करणे अद्यापही बाकी आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून मिळकतकर विभागातील कर्मचारी उत्पन्नवाढीच्या कामात अडकल्याने हे काम रखडले आहे. प्रशासनाने जुन्याच माहितीच्या आधारे बिले काढल्यास नागरिकांना त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आलेल्या अर्जांची तपासणी करून त्याच्या नोंदी करून त्यानंतरच बिले काढण्याचा निर्णय मिळकतकर विभागाने घेतला आहे. त्यामुळे एका महिन्यात ही संपूर्ण कामे पूर्ण करून एक मे पासून बिलांचे वाटप सुरू केले जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांची मान्यता देखील घेण्यात आल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

नागरिकांना ४० टक्के सवलत देण्याचे अर्ज प्रलंबित असल्याने एक मे पासून मिळकतकराची बिले दिली जाणार आहेत. नागरिकांनी सवलतीचा फायदा घेऊन वेळेत मिळकतकर भरावा. – प्रतिभा पाटील, उपायुक्त मिळकतकर विभाग, पुणे महापालिका