महापालिकेचा मिळकत कर थकवलेल्या बडय़ा थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारपासून बँड पथकाचा वापर सुरू करण्यात आला आणि थकबाकीदारांच्या घरापुढे बँड वाजू लागताच एकाच दिवसात तब्बल दोन कोटी रुपयांचा थकित कर वसूल झाला.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी बँड वादनाचा हा प्रयोग ते नगर येथे असताना तेथे राबवला होता. त्या प्रयोगाला यश येऊन थकबाकीची वसुली तेथे चांगल्या प्रकारे झाली होती. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती गुरुवारपासून जगताप यांच्या संकल्पनेतून पुण्यात सुरू झाली. या वेगळ्या वसुली मोहिमेची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख, उपायुक्त हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाच लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांकडून वसुली करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके थकबाकीदाराच्या घरापुढे वा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन त्यांना थकबीकीची कल्पना देतात आणि बाकी भरण्यासाठी संधी देतात. या संधीनंतरही थकबाकी भरण्यासाठी नकार दिल्यास बँडवादन चालू केले जाते. प्रत्येक वसुली पथकाबरोबर तीन बँडवादक देण्यात आले असून या वादनामुळे चांगली वसुली होत असल्याचे  निकम यांनी सांगितले.
बँडवादन चालू ठेवल्यानंतरही थकबाकी भरली गेली नाही, तर संबंधित मिळकत सील करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरू झाल्यानंतर गुरुवारी पहिल्याच दिवशी चाळीस थकबाकीदारांकडून दोन कोटींची थकबाकी वसूल झाली, असेही निकम यांनी सांगितले. धनकवाडी, बाणेर, येरवडा, शिवाजीनगर, येरवडा, मार्केटयार्ड वगैरे भागात वसुली पथके पाठवण्यात आली होती. या कारवाईत अनेक बडय़ा हॉटेलांचा समावेश असून थकबाकी वसुलीसाठी वडगावशेरी येथील एका मॉलला सील लावण्यात आल्याचेही निकम म्हणाले.