लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील ३१ मार्च २०२३ अखेर ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता महापालिकेच्या रडारवर आहेत. ३९ हजार ६५५ मालमत्ता धारकांकडे ६५० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी संदेश, फोनद्वारे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही थकीत कर न भरल्यास येत्या पंधरा दिवसांत जप्ती कारवाईचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांच्या कराची वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी ३५० कोटी थकीत असलेला कर वसूल करण्यात आला आहे. जुना थकीत कर वसूल होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक लाखांपेक्षा जास्त कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांना देयकाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा बजावल्या आहेत. ३९ हजार ६५५ मालमत्ता धारकांकडे ६४७ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांचा कर थकीत आहे. २०२२-२३ मध्ये संपूर्ण कराचा भरणा केलेल्या मात्र यावर्षी अद्यापि मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांना संपर्क साधला जाणार आहे. सवलत योजनेसह कराचा भरणा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विभागीय कार्यालयाकडील गटप्रमुखांमार्फत मोबाइल ॲपचा वापर करून फोन केले जाणार आहेत.
आणखी वाचा-पुणे शहरापासून फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे होणार कायमची वेगळी, जाणून घ्या कारण
प्रकल्प सिद्धीसाठी विकसित केलेल्या मोबाइल ॲपमध्ये जप्ती मीटर ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे कारवाईची नोंद या जप्ती मीटरमध्ये होणार आहे. थकबाकीदारांना दिलेल्या एकूण भेटी, प्रत्येक भेटीत त्यांना थकबाकीदार यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद, त्यांनी केलेले वायदे इत्यादी नोंद होणार आहे. त्यामुळे कुठला थकबाकीदार कसा आणि किती प्रतिसाद देतो, याचे विश्लेषण करता येणार आहे. त्यातून जप्ती आणि नंतर ज्यांची आर्थिक क्षमता असताना जाणीवपूर्वक कर न भरणाऱ्या लोकांच्या मालमत्तांची जप्ती आणि लगेचच लिलाव प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
शंभर मालमत्तांचा लिलाव
गतवर्षी दोन हजार मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील काही मालमत्ता धारकांनी थकीत कर भरला आहे. मात्र अद्याप काही मालमत्ता धारकांनी थकीत कर भरलेला नाही. त्यातील शंभर मालमत्ता निवडण्यात आल्या आहेत. त्यात निवासी, बिगर निवासी तसेच औद्योगिक अशा मालमत्तांचा समावेश आहे. त्यांची या वर्षी लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
नागरिकांच्या विविध शंकांचे समाधान करण्यासाठी कर संवाद घेण्यात येणार आहे. कर सवलत, कर विषयक बाबींची माहिती, शंकांचे समाधान केले जाणार आहे. नागरिक ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपस्थित राहू शकतात. सर्व प्रशासन अधिकारी आणि मंडल अधिकारी त्यावेळी मुख्य कार्यालयात हजर असणार आहेत. -नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका