राज्याच्या पोलीस दलामध्ये ६१ हजार पोलिसांची नव्याने भरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत ठेवणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केली.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात पोलीस दल आणि अग्निशामक दलातील जवानांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीव सिंघल, महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, उपमहापौर बंडू गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमेश पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम आणि कार्यवाह विश्वजित कदम उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील पोलीस दलाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. २६ / ११ च्या हल्ल्यामध्ये कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत पकडून आपल्या पोलीस दलाने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले. मात्र, पोलिसांच्या चांगल्या कार्याची दखल घेतली जात नाही. गेल्या वर्षांत केंद्रीय यंत्रणांनी १४२ वेळा महाराष्ट्राला धोक्याच्या सूचना दिल्या. राज्यातील पोलीस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. कमीत कमी सुविधांमध्ये पोलीस दल जास्त काम करते आहे. पोलीस दलातील मनुष्यबळ वाढवणे, त्यांना अधिक सुविधा देणे, कामाचे तास कमी करणे या बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या घरांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. पोलिसांसाठीच्या घरबांधणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येईल.’’
भारती विद्यापीठाच्या वतीने पुणे पोलिसांना ५० बॅरिकेड्स आणि पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला इमर्जन्सी मेडिकल किट देण्यात आले. या वेळी मेडिकल किट देणे हे आमचे काम आहे, विद्यापीठात प्रवेश देणे हे तुमचे काम आहे, असा टोला आबांनी यांनी पतंगराव कदम यांना लगावला. पोलिसांना सुविधा देणे हे आमचे काम आहे. ते आम्ही केले नाही म्हणून तुम्हाला करावे लागले. पण प्रवेश देणे तुमचे काम आहे. आम्ही आमचे काम करू, तुम्ही तुमचे करा. पुण्यातील पाच कॉन्स्टेबलच्या मुलांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भारती विद्यापीठाने प्रवेश द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव चर्चेत आहे. त्याचा संदर्भ देत आबांनी नर्मविनोदी शैलीत कोपरखळी मारली. आपली मुले मोठी व्हावीत असे सर्वानाच वाटते. माझा मुलगा अजून लहान आहे. पण, आपले लोकसभेचे वेध गृहमंत्र्यांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत, अशी टिपणी आबांनी करताच सभागृहामध्ये हास्याचा धबधबा उसळला.
पोलिसांच्या भरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत ठेवणार – आर. आर. पाटील
राज्याच्या पोलीस दलामध्ये ६१ हजार पोलिसांची नव्याने भरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत ठेवणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केली.
First published on: 10-11-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal of police recrutment will submit in next cabinate meeting r r patil