लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मुंढव्यातील काही भागाचा विकास योग्य पद्धतीने झाला नसल्याने येथे ‘टाउन प्लॅनिंग’ (टीपी) प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शहर सुधारणा समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
महापालिकेच्या हद्दीतील मुंढवा भागाला महापालिकेच्या विकास आराखड्याला (डीपी) मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या भागातील सर्व्हे नंबर ४५ ते ४८, तसेच सर्व्हे नंबर ६४ ते ७० आणि परिसराचा विकास योग्य पद्धतीने झाला नसल्याने तेथे टीपी स्कीम राबविण्यासाठी मान्यता द्यावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ठेवला आहे.
महापालिकेच्या आज गुरुवारी (५ मार्चला) होणाऱ्या शहर सुधारण समितीत हा विषय मान्यतेसाठी येणार असून, महापालिकेत सध्या आयुक्त हेच प्रशासक असल्याने या विषयाला मंजुरी मिळणार, हे निश्चित आहे. मुंढव्याच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतरही या भागाचा योग्य विकास झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी ‘टीपी योजना’ राबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी हा प्रस्ताव शहर सुधार समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
कशासाठी किती क्षेत्रफळ?
मुंढवा येथील सर्व्हे नंबर ४५ ते ४८ आणि सर्व्हे नंबर ६४ ते ७० या भागात ही टीपी योजना राबवली जाणार आहे. या भागाचे एकूण क्षेत्रफळ ७ लाख ५० हजार चौरस मीटर आहे. त्यातील आधीच मंजूर झालेल्या बांधकाम क्षेत्राचे क्षेत्रफळ १ लाख ७३२ चौरस मीटर आहे. रस्त्यासाठी १ लाख १० हजार चौरस मीटर, आरक्षण क्षेत्रासाठी ४३ हजार ५०० चौरस मीटर आणि औद्योगिक आरक्षण क्षेत्रासाठी ११ हजार ८०० चौरस मीटर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे.
आताच प्रस्ताव का?
महापालिकेच्या निवडणुका रखडल्याने महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही. संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हातात देण्यात आला आहे. मुंढवा भागाचा विकास करण्यासाठी येथे टीपी योजना करावी, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली जात होती. मात्र, आताच महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी का आणला, अशी चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.