पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय व्हावे, अशी मागणी खूप वर्षांपासून होत आहे. याबाबतचे प्रस्ताव सरकार दरबारी दशकाहून अधिक काळ धूळखात आहेत. पुण्यातील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत नसल्याने हा प्रस्ताव पुढे सरकत नव्हता. आता या प्रस्तावाला पुन्ही गती मिळाली असली, तरी तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एकत्रित राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
शहरातील आरोग्य सुविधांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. रुग्णसेवेचा सर्वाधिक बोजा ससून सर्वोपचार रुग्णालयावर पडतो. महापालिकेकडून आरोग्य सुविधांचा विस्तार आणि दर्जासुधार यासाठी पावले उचलली जाताना दिसत नाहीत. यातच आता पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. पुण्यात कर्करुग्णालय अतिशय आवश्यक असल्याने या सुविधेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेत फार मोठी भर पडणार आहे. याचबरोबर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कर्करुग्णांना मुंबईला उपचारासाठी जावे लागणार नाही. कर्करोगावरील खासगी रुग्णालयातील उपचार परडवणारे नसल्याने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी हा आशेचा किरण ठरणार आहे.
आणखी वाचा-दिल्लीतील साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल, प्रतिभा पाटील यांचा विश्वास
ससून सर्वोपचार रुग्णालयाशेजारील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावर कर्करुग्णालय उभारण्याची चर्चा अनेक वर्षे सुरू होती. याबाबत प्रस्ताव २०१३ मध्ये पाठविण्यात आला होता. या जागेवर कर्करुग्णालय उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधीपासून आग्रही होते. त्यांनी जाहीरपणे या जागेवर कर्करुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. याचबरोबर ही जागा ताब्यात घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. प्रत्यक्षात एमएसआरडीसीने हा भूखंड हा खासगी विकासकाला ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिला. त्यामुळे कर्करुग्णालयाच्या उभारणीबाबत अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला.
आता औंध उरो रुग्णालयातील जागेवर कर्करुग्णालय उभारण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. औंध उरो रुग्णालयाची एकूण ८५ एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेवर कर्करुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचा ४०० ते ५०० रुग्णशय्येचे कर्करुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रात कर्करोगावरील प्रगत उपचार होतील आणि त्याला संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयही असेल. कर्करुग्णालयाच्या उभारणीसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार देईल आणि ४० टक्के निधी राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग देईल, असा प्रस्ताव आहे. कर्करुग्णालयात या माध्यमातून पुरेसा निधी मिळवून आधुनिक दर्जाची आरोग्य सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
आणखी वाचा-पुणे : पिस्तूल बाळगणारा मुंबईतील सराइत गजाआड, पिस्तुलासह काडतूस जप्त
गेल्या काही वर्षांपासून औंध उरो रुग्णालयाची जागाही खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तेथे कर्करुग्णालय उभारण्याचा प्रस्तावही ऐनवेळी डावलला जाऊ शकतो. यातून पुणेकरांना केवळ कर्करुग्णालयाची प्रतीक्षाच करावी लागेल. पुण्यातील लोकप्रतिनिधींना आतापासून कर्करुग्णालयासाठी आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांसाठी आवश्यक असलेले कर्करुग्णालय उभे राहायला हवे, यासाठी पक्षीय मतभेद बाजूला सारून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. अन्यथा गेले दशकभर सरकारी दरबारी धूळखात असलेला प्रस्ताव पुढील काळातही तसाच पडून राहील. कर्करुग्णालय हे पुणेकरांसाठी काळाची गरज असून, त्यासाठी आताच पावले न उचलल्यास त्याची किंमत आगामी काळात सर्वांनाच मोजावी लागेल.
sanjay.jadhav@expressinda.com