पुणे : सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीबरोबरच पार्किंगच्या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एका बाजूचे पदपथ आणि सायकल मार्ग काढण्यात येत असून रस्ता वाहतुकीसाठी रुंद करण्यात येत आहे. मात्र रस्त्यावर वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच पार्किंगची समस्याही पुढील किमान तीन वर्षे सहन करावी लागणार आहे.

पाच पर्यायी रस्त्यांची कामे अपुरी असतानाच सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. मुख्य सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणारे रस्ते कागदावरच राहिल्याने सिंहगड रस्ता परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळता आली असती. सायकल मार्ग, पादचारी मार्ग काढण्यात येणार असल्याने रस्त्याची रुंदी वाढणार असून वाहतुकीला मात्र अडथळा निर्माण होणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

 उड्डाणपुलासाठी तब्बल ७० खांब उभारण्यात येणार आहेत. या कामामुळे वाहतूक कोंडी होईल, असे सांगत प्रारंभी वाहतूक पोलिसांनी कामाला परवानगी नाकारली होती. मात्र पदपथ, सायकल मार्ग काढण्यात येणार असल्याने रस्त्यांची रूंदी वाढणार असून वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला. सध्या धायरीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या एका बाजूचे पदपथ आणि सायकल मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे रस्ता वाढणार असला तरी पार्किंगची समस्या निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदपथ आणि सायकल मार्ग काढल्याने दुचाकी, चारचाकी वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न येत्या काही दिवसांत निर्माण होणार आहे.  वाहनचालक आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या भागात अनेक वेळा रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या केल्या जातात. मात्र आता त्यासाठी रस्ताच उपलब्ध होणार नसल्याने सोसायटय़ांकडे जाणाऱ्या गल्लीबोळात दुचाकी उभ्या कराव्या लागण्याची भीती आहे.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी, वडगांव, सन सिटी, माणिकबागेकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी नदीपात्रातून रस्ता पर्यायी रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार तो उखडून टाकण्याची वेळ महापालिकेवर आली. सध्या फनटाइम चित्रपटगृहालगतच्या कालव्यापासून विठ्ठलवाडीपर्यंत रस्ता विकसित करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असला तरी रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यातच माणिकबाग, सन सिटी, विठठ्लवाडीकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे प्रमुख सिंहगड रस्त्यावरूनच वाहतूक होत असते. प्रामुख्याने राजाराम पुलापासून धायरीपर्यंत वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे.

२.५ किलोमीटरचा उड्डाणपूल

प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी एकूण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाणपूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कुठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखडय़ानुसार उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दररोज सव्वालाख वाहनांची ये-जा

या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे. भविष्यकाळात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे २.७४ किलोमीटर अंतराची वाहतूक थेट होईल, असा दावा करण्यात आला आहे.

Story img Loader