समाजमाध्यमाचा वापर करुन सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. खराडी भागात छापा टाकून पोलिसांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील दोन युवतींना ताब्यात घेतले. या प्रकरणी एका दलालास अटक करण्यात आली असून साथीदार दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>भेटवस्तुच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना
परराज्यातील तरुणींना पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आणले जात असून दलालांची टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला. दलालाने दोन युवतींना खराडी भागात सोडले. खराडी भागात पोलिसांच्या पथकाने सापळा लावला होता. एका हाॅटेलच्या परिसरात दोन युवती आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दलाल मुकेश ज्ञानेश्वर मोरे (वय ३०, रा. चऱ्होली, आळंदी रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रोकड, मोबाइल संच आणि दुचाकी असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>“१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ऋतुराजची अनेकांनी उडवली खिल्ली, पण…”, आई-वडिलांनी व्यक्त केली भावना
मोरे याचे साथीदार दलाल विकी, राहुल यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई संदीप कोळगे यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती इंदूर आणि आग्रा शहरातील आहेत.पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.