लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह तिघींना ताब्यात घेतले, तसेच मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक शिव राजेश भोसले (वय २१, रा. एनआयबीएम रस्त, कोंढवा), मालक निखिल राजेंद्र नाईक (वय २६, रा. फुरसुंगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक छाया जाधव यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रस्त्यावरील आयरीन स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आणखी वाचा-चार कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाईकेली. परदेशातील तरुणीसह तिघींना ताब्यत घेण्यात आले. चौकशीत भोसलेने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली. तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. पाेलिसांच्या पथकाने मसाज सेंटरमधून मोबाइल संच, तसेच अन्य साहित्य असा ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.