पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मसाज सेंटरचालक नितीन गिरमल कांबळे (वय २९, वेताळबाबा चौक, नऱ्हे) याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार मनीषापुकाळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नऱ्हे येथील राॅयल १९ थाई स्पा मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. पाेलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरचालक कांबळे तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याची पोलिसांनी काढली धिंड

ताब्यात घेण्यात आलेल्या चार तरुणींची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, अनिकेत पोटे आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader