लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कल्याणीनगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली. ज्ञानेश्वर महादेव भोई (वय २६, रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई गौरी झोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागातील द स्पा व्हिला या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरमधून महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत भोई याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. भोई याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी ३३ गुन्हे दाखल करण्यात आले होते.