पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नव्हता. यामुळे कॅबचालकांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका प्रवाशांना बसला. याचबरोबर बंदच्या काळात सेवा देणाऱ्या काही कॅबचालकांना मारहाण करण्याचेही प्रकार घडले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कॅबचालकांनी सकाळी ७ पासून हा बंद सुरू केला. या बंददरम्यान, अनेक ठिकाणी प्रवाशांना कॅब मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: पुणे विमानतळावरील प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. विमानतळावरील एरोमॉल येथे मंगळवारी अतिशय कमी कॅब होत्या. त्यामुळे प्रवाशांना कॅब मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. बंदचा फायदा घेऊन काही कॅबचालकांनी जादा पैसे उकळल्याच्या तक्रारीही अनेक प्रवाशांनी केल्या.
हेही वाचा >>>मोठी बातमी : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेला बिबट्याचा अखेर जेरबंद
भाडेवाढीच्या मुद्द्यावर आरटीओमध्ये ओला, उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कॅबचालकांच्या संघटनांच्या दोन बैठकी झाल्या होत्या. या दोन्ही बैठकीत दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. याचबरोबर कॅबचालकांच्या संघटनांमध्येही वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने कॅबचालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
नेमका मुद्दा काय?
वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे हे नवीन दर जानेवारी महिन्यात लागू झाले असूनही ओला, उबरने याची अंमलबजावणी केलेली नाही, अशी कॅबचालकांची तक्रार आहे.
हेही वाचा >>>पुणे : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा ठावठिकाणा लागेना! अठ्ठेचाळीस तासानंतरही शोध घेण्यात अपयश
आम्हाला आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नसून, आता आमचा बेमुदत बंद सुरू झाला आहे. कॅबचालकांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बंद सुरूच राहील.– डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच
ओला आणि उबरविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे ऑटो टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून जिल्हाधिकारी व आरटीओ प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. ओला, उबरची विनापरवाना सेवा सुरू असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.- बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन