लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बीड येथील घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन आठ मार्च शनिवार रोजी करण्यात आले होते तो आता रद्द करुन नऊ मार्च रोजी रविवारी हा सर्वं धार्मिय मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील भाऊ आणि बहिणीचा सहभाग राहणार आहे, अशी महिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी जाहीर केलं आहे.
शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे, याच दिवशी महिला दिनाच्या औचित्य साधून सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. या बाबत एक बैठक सुद्धा घेण्यात आलेली होती मात्र देशमुख यांच्या कुटुंबियांतील व्यक्ती शनिवारी आठ मार्च रोजी बारामती मधील या मोर्चा मध्ये उपस्थित राहू शकत नसल्यानी शनिवार हा मोर्चा रद्द करुन रविवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी महिती अमरसिंह जगताप यांनी दिली.
बारामती कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून हा निषेध मोर्चा भिगवन चौकापर्यंत काढला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आली आहे. या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजा बरोबरच इतर सर्व धर्मीय बांधवांनी सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात सध्या विविध संघटनाच्या कडून मोठी आंदोलने केली जात असून विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड येथे सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता. या मूक मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते, तसेच पुण्यामध्येही जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून बीड या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली होती,
बारामतीत रविवारी दिनांक नऊ मार्चला काढण्यात येणाऱ्या या निषेध मोर्चाच्या प्रसंगी बारामती बाजार पेठेतील दुकानदारांनी आप आपली दुकाने या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाच्या कालावधीत बंद करावीत, असे आवाहन मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. या बाबतची महिती सुद्धा माहिती सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.