पुणे : गेली अनेक वर्षे विविध टप्पे पार करून रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीसाठी असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आता तांत्रिक बाबी निर्माण केल्या जात आहेत. मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सोनेरी त्रिकोण साधण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याला खीळ घालण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून ‘रेल्वे कम रोड’चा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोल्हे म्हणाले, गेली अनेक वर्षे आपण या प्रकल्पाबाबत पाठपुरावा करतो आहोत. राज्य शासन, रेल्वे बोर्ड आदींच्या मंजुरीनंतर रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याच्या टप्प्यात असलेल्या या प्रकल्पाबाबत आता शंका घेतल्या जात आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करणयात आली आहे. आतापर्यंत ही मंडळी झोपली होती का? एकीकडे बुलेट ट्रेनचा विदेशी तंत्रज्ञानाचा प्रकल्प पुढे नेला जातो. मात्र, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया म्हणाताना संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान असलेला सेमी हायस्पीडच्या प्रकल्पाला खीळ घातली जात आहे.
हेही वाचा : पुणे वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर पोलीस आयुक्तांचा ‘अंकुश’
लोकांच्या हिताचा हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही राजकीय हेतू न ठेवता हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी दिल्लीत आपले वजन वापरावे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले. आपणही याबाबत दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ, त्याचप्रमाणे लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करून प्रसंगी याबाबत आंदोलनही केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.