लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मिळालाच पाहिजे यासह विविध मागण्यासाठी शहरातील महा मेट्रोच्या महापालिका मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र पावटेकर याच्यासह ५ ते ६ पुरुष आणि १० महिलांवर विविध कलमांन्वये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अचानक कोणतीही परवानगी न घेता मेट्रो सेवा ठप्प केली. दोन तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो सेवा यामुळे विस्कळीत झाली. पोलिसांना या आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी मेट्रोच्या रूळावरच आंदोलन सुरू केल्याने, मेट्रो सेवा विस्कळीत झाली.

पोलिसांनी आंदोलकाना विनंती करून आंदोलन थांबवण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या हाताला किरकोळ दुखापत देखील झाली. यापूर्वी, पोलिसांनी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत, आंदोलकांशी बोलण्यास सांगितले असता, आंदोलकांनी त्यांना देखील शिवीगाळ केली.

यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेत, त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय नोकरांना मारहाण, खोटी आश्वासने देणे, कट-कारस्थान करणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

कोणताही परवानगी न घेता आंदोलकांनी थेट मेट्रो सेवा ठप्प केली. पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणे, प्रशासनाला धमकावणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे असे प्रकार कोणत्याही स्तरावर खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास बळाचा वापर केला जाईल. अशा आंदोलकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. -संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

Story img Loader