पुणे : पैशांसाठी गर्भवती महिलेवर उपचार करण्याचे टाळल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे शहरात शुक्रवारी जोरदार पडसाद उमटले. शहरातील सर्वच राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी, तसेच मृत्यू झालेल्या गर्भवतीच्या नातेवाइकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलने करून रुग्णालयावर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची दखल घेऊन धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. रुग्णालयाच्या अंतर्गत तज्ज्ञ चौकशी समितीने मात्र हलगर्जीचे आरोप फेटाळून लावले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी करून उपचारांस नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी केला. ‘नंतर पैसे भरतो, असे नातेवाइकांनी सांगूनही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती रुग्णाला दाखल करून घेऊन उपचार सुरू केले नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. परिणामी, उपचारांस विलंब होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी केल्याची पावतीही आहे,’ असे ईश्वरी भिसे यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेने रुग्णालयाला नोटीस दिली, तर विविध राजकीय पक्ष, संघटना व संस्थांच्या आंदोलनांनी रुग्णालय परिसर ढवळून निघाला. त्यात या प्रकरणातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्या नातेवाइकांच्या रुग्णालयावर हल्लाही झाला.
दुसरीकडे, ‘गर्भवतीने डॉक्टरांचा सल्ला मानला नाही,’ असे याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासनाने चौकशीसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटले. जेवढे जमतील, तेवढे पैसे द्या, असे नातेवाइकांना सांगण्यात आल्याचे या समितीच्या अहवालात म्हटले असून, आगाऊ पैसे मागितल्याचा राग आल्याने नातेवाइकांकडून आरोप सुरू आहेत, असा दावाही रुग्णालयाने केला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने चौकशी सुरू करून शुक्रवारी रुग्णालयाला भेटही दिली.
मणिपाल रुग्णालयाच्या अहवालात काय?
ईश्वरी भिसे यांना तीव्र प्री-एक्लॅम्पसिया झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे गर्भावस्थेतील रक्तस्त्राव होऊन त्यातून हृदयविकाराचा झटका त्यांना आला. याचबरोबर इतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाने दिली. ‘आमच्याकडे दाखल होण्यापूर्वी रुग्णाला इतर रुग्णालयात आपत्कालीन उपचार देण्यात आले. तिथे रुग्णाच्या प्रसूती संबंधित गंभीर गुंतागुंतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्यात आले. आमच्याकडे दाखल होताना रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्यामुळे, प्रसूतितज्ज्ञ, हृदयविकार आणि चेताविकार विभागांनी समन्वय साधून सर्व संबंधित उपचार केले. रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यातून यशस्वीपणे वाचवण्यात आले; परंतु त्या वेळेपर्यंत रुग्णाच्या मेंदूचा ऑक्सिजन कमी होऊन गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही मेंदूच्या दुखापतीत सुधारणा होऊ शकली नाही आणि शेवटी रुग्ण दगावला,’ असे रुग्णालयाने सांगितले.
घटनाक्रम
●ईश्वरी भिसे यांना २८ मार्चला सकाळी मंगेशकर रुग्णालयात आणले. २८ मार्चलाच सायंकाळी सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
●सूर्या हॉस्पिटलमध्ये २९ मार्चला सकाळी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला.
●ईश्वरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले.
●मणिपाल रुग्णालयात उपचारांदरम्यान ३१ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.